अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टी, 50 महसूल मंडळांत दमदार पाऊस
Ahmednagar Rain News: जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी मुसळधार पाऊस, पावसामुळे जिल्ह्याचे चित्र पालटले.
अहमदनगर: नगर शहरात बुधवार (दि.27) रोजी पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. शहरातील सावेडी आणि कापूरवाडी महसूल मंडळात 77 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गणपतीच्या सहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील पावसाची सरासरी 52 टक्क्यांवरून 84.5 टक्क्यांवर पोहचली असून यात विशेष म्हणजे सर्वाधिक पाण्याचे टँकर सुरू असणार्या आणि पाणी टंचाई असणार्या नगर, पारनेर तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के पावसाची नोंद झाली आहे. श्रीगोंदा तालुक्याने देखील पावसाची शतप्रतीशत सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात 50 महसूल मंडळांत दमदार पाऊस झाला आहे.
गणपती बाप्पा नगरकरांना पावला असून गणेशोत्सवाच्या दुसर्या दिवसापासून जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी (मंगळवारी) पावसाने जोरदार हजेरी लावली. या काळात जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पावसाची नोंद झाली असून नगर शहर, तालुका आणि पारनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. काल नगर शहरातील दोन महसूल मंडळांत 77 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गणेशोत्सव काळात झालेल्या पावसामुळे जिल्ह्याचे दुष्काळाचे चित्रच बदलले असून अनेक तालुक्यांत खरीप पिकाच्या काढणीचे काम अंतिम टप्प्यात असून रब्बीच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांत सरासरीच्या शंभर टक्क पाऊस झाला आहे. यामुळे दुष्काळाचे चित्र फिक्के झाले असून बुधवारपासून सुर्याच्या हस्त नक्षत्रास सुरूवात झाली आहे. चित्रा नक्षत्रात गेल्या सहा दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्याचे चित्र पालटले आहे.
जिल्ह्यात मंगळवारी नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिचोंडी पाटील, वाळकी, चास, रुईछत्तीशी (नगर). पारनेर (पारनेर). मांडवगण, पेडगाव (श्रीगोंदा). कर्जत, राशिन, भांबोरा, कोंभळी, मिरजगाव, माहिजळगाव, मिरी (कर्जत). अरणगाव (जाखमेड). शेवगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, (शेवगाव). माणिकदौंडी, कोरडगाव, करंजी, मिरी (पाथर्डी). नेवासा बु, सलाबतपूर, कुकाणा, चांदा (नेवासा). वांबोरी (राहुरी). संगमनेर, धांदरफळ, आश्वी, सीबलापूर, घारगाव, डोळसणे, पिंपळणे (संगमनेर). अकोले, वीरगाव, समशेरपूर, साकीरवाडी, राजूर, शेंडी, कोतूळ, ब्राम्हणगाव (अकोल). राहाता, लोणी, बाभळेश्वर (राहाता), या ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे.
विजांच्या लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह हत्ती नक्षत्राच्या पावसाने श्रीरामपूरकरांची दाणादाण उडविली. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास तासभर चाललेल्या मुसळधार पावसाने सखल भागात पाणीच पाणी झाले होते. त्यानंतर रात्री 9 वाजता सुरू झालेला जोरदार पाऊस रात्री 9.45 वाजेपर्यंत झाला. या दरम्यान 9.26 वाजता जोरदार वीज कडाडली. या पावसामुळे शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता.
Web Title: Heavy rain in Ahmednagar Heavy rain in 50 Revenue Circles
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App