अहमदनगर: शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा. गाडेंसह चौघांवर गुन्हा
Breaking News | Ahmednagar Crime: वेटरला धमकावल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह चौघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
अहमदनगर: सक्कर चौकातील हॉटेल उदयनराजे पॅलेसच्या वेटरला धमकावल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह चौघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रिन्सकुमार हरिनारायण सिंग (वय 25 रा. उदयनराजे हॉटेलच्या पाठीमागे, सक्कर चौक, नगर) यांनी तक्रार दिली आहे.
प्रा. गाडे यांच्यासह राकेश सिंग, युवराज गाडे, रमाकांत गाडे (सर्व रा. यश पॅलेस हॉटेल, सक्कर चौक, नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सिंग यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आपण यापूर्वी यश पॅलेस हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होतो. परंतु सहा महिन्यांपूर्वी आपण ते काम सोडले असून सध्या हॉटेल उदयनराजे पॅलेसमध्ये काम करत आहोत. याचा राग मनात धरून हॉटेल यश पॅलेसचा व्यवस्थापक राकेश सिंग याने मोबाईलवर फोन करून ‘तू उदयनराजे हॉटेलवर कामाला का गेला, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच पुन्हा वारंवार फोन करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच त्याच फोनवरून शशिकांत गाडे, रमाकांत गाडे, युवराज गाडे यांनीही शिवीगाळ करत तू नगर सोडून जा अशी धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांच्या विरूध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 351 (2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार बनकर अधिक तपास करत आहेत.
खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे आजारी असून पुण्यात उपचार घेत आहेत. तरीही त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.
Web Title: Head of Shiv Sena Thackeray Group Prof. Crime against four with cars
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study