Home अहिल्यानगर क्रूर हत्या, गाठोडेत मुंडके, एक पाय आणि दोन हात आढळले, आईने मृतदेहाची...

क्रूर हत्या, गाठोडेत मुंडके, एक पाय आणि दोन हात आढळले, आईने मृतदेहाची ओळख पटवली

Breaking News | Ahilyangar Crime: एका विहिरीत खांडोळी अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मात्र, आज (१५ मार्च) दाणेवाडीतील दुसऱ्या विहिरीत पोत्यामध्ये मानवी अवयव सापडले.

head, a leg and two arms were found in a bundle, the mother identified the body

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे एका अमानुष हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. काही दिवसांपूर्वी एका विहिरीत खांडोळी अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मात्र, आज (१५ मार्च) दाणेवाडीतील दुसऱ्या विहिरीत पोत्यामध्ये मानवी अवयव सापडले असून ते माऊली सतीश गव्हाणे यांचे असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

माऊलीच्या कानातील बाळीवरून त्यांच्या आईने मृतदेहाची ओळख पटवली. मात्र, या घटनेबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याप्रकरणी स्थानिक सामाजिक नेते दौलत नाना शितोळे यांनी गव्हाणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची व्यथा ऐकली. कुटुंबीयांनी पोलिस प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप केला असून आजूबाजूच्या विहिरींची तपासणी करण्याची मागणी केली आहे. मात्र, पोलिसांकडून आपत्ती व्यवस्थापन पथक उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

या परिस्थितीची दखल घेत शितोळे यांनी स्वतःच्या २२ जणांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला शोध मोहीम सुरू करण्यास सांगितले. या मोहिमेदरम्यान, शेजारील विहिरीत एक संशयास्पद गाठोडे आढळले. पोलिसांकडे आवश्यक सुरक्षा साधने नसल्याने आणि घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ञ व रुग्णवाहिका उपस्थित नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली.

गाठोडे उघडल्यानंतर त्यामध्ये मुंडके, एक पाय आणि दोन हात आढळले. माऊलीच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाची अशी निर्दयी हत्या झाल्याने हंबरडा फोडला. “माझ्या लेकराने असा कोणता गुन्हा केला होता की त्याची एवढ्या क्रूरपणे हत्या करण्यात आली?” असा सवाल माऊलीच्या वडिलांनी केला.

या निर्घृण हत्येचा तपास तातडीने व्हावा, अशी मागणी दाणेवाडी ग्रामस्थ आणि सकल गोपाळ समाजाने केली आहे. तपासात दिरंगाई झाल्यास नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. स्थानिक पोलिसांवर विश्वास नसल्याने हा तपास त्वरित सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: head, a leg and two arms were found in a bundle, the mother identified the body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here