संगमनेर: हनुमान जयंती वाद, आणखी दहा जणांवर गुन्हा दाखल
Breaking News | Sangamner Crime: पोलिसांनी दुसऱ्या गटातील तरुणांवर घटनेच्या पंधरा दिवसांनंतर दुसरा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात शहरातील दोन वकिलांसह एकूण दहा जणांचा समावेश.
संगमनेर: शहरात हनुमान जयंती रथोत्सवात दोन गटांत झालेल्या वादानंतर तब्बल तीन दिवसांनी शहर पोलिसांनी काही तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आता, या प्रकरणी पोलिसांनी दुसऱ्या गटातील तरुणांवर घटनेच्या पंधरा दिवसांनंतर दुसरा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात शहरातील दोन वकिलांसह एकूण दहा जणांचा समावेश आहे.
१२ एप्रिल रोजी झालेल्या हनुमान जयंतीच्या रथोत्सवात वाद झाला होता, यानंतर, रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष कमलाकर विधनाथ भालेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ११ जणांविरुद्ध प्रथम गुन्हा नोंदविला होता. यात विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमरजी, शेखर मधुकर सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, श्याम मधुकर नालकर, सोनू गोविंद नालकर, शुभम मनोज परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या, मयूर जाधव उर्फ पप्पू, राहुल शशिकांत नेहलकर आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता.
दरम्यान, दुसऱ्या गटातील मारहाण झालेल्या तरुणाची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नसल्याचा आरोप करत, खोटे गुन्हे मागे घ्यावेत. यासाठी शहरातील युवकांनी रस्त्यावर उतरून मंगळवारी (दि.२२) महामोर्चा काढण्याचा इशारा दिला होता, त्यावेळी पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला, तब्बल पंधरा दिवसांनी पोलिसांनी ललित शिपी यांच्या फिर्यादीनुसार, कमलाकर विश्वनाथ भालेकर, योगराज कुंदनसिंह परदेशी, चेतन विलास तारे, अक्षय अविनाश थोरात, हर्ष श्यामसुंदर जोशी, श्यामसुंदर रामेश्वर जोशी, गिरीश राजेंद्र मेंद्रे, श्रीराम अरविंद गणपुले, भगवान तुकाराम गौते आणि शुभम चंद्रकांत लहामगे या दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
ललित शिंपी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ११ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता ते त्यांचा मित्र ललित परदेशी (रा. मोची गल्ली, सय्यदबाबा) यांच्यासोबत हनुमान जयंतीनिमित्त आयोजित सलामी वादन पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी कमलाकर विश्वनाथ भालेकर, योगराज कुंदनसिंग परदेशी, चेतन विलास तारे, अक्षय अविनाश थोरात आणि हर्ष शामसुंदर जोशी हे तिथे उपस्थित होते. कमलाकर भालेकर यांनी त्यांना शिवीगाळ करत, येथे का आला आहेस, तू येथून निघून जा नाहीतर तुला पाहून घेईल, अशी धमकी दिली. त्यामुळे कोणताही वाद नको म्हणून फिर्यादी तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी, १२ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी त्यांचा मित्र गणेश भांगे, नितीन जाधव आणि अक्षय दाणी यांच्यासह मारुती दर्शन आणि रथोत्सवासाठी चंद्रशेखर चौकात आले होते. त्यावेळी योगराज परदेशी यांनी त्यांच्याजवळ येत, तुम्हाला काल रात्रीच येथे येऊ नका म्हणून सांगितले होते, तरी तुम्ही येथे का आलात, असे म्हणून शिवीगाळ केली. फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना, तिथे आलेल्या कमलाकर भालेकर यांच्यासह अन्य आरोपींनी शिवीगाळ करत पाहून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश पाटील करत आहेत. या दुसऱ्या गुन्ह्यामुळे हनुमान जयंती रथोत्सवातील वादाला आता अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले असून, पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
Breaking News: Hanuman Jayanti controversy, case registered against ten more people Sanganer Crime