नवरीला घेऊन चाललेल्या नवरदेवाची अडवली गाडी, जुन्या प्रेम संबंधांमुळे धक्कादायक घटना
Breaking News | Chhatrapati sambhajinagar: रस्त्यावर नवविवाहितेला पळवून घेऊन जाण्याचा कट वऱ्हाडी मंडळीच्या सतर्कतेमुळे उधळून लावला. अपहरणकर्त्यांनी घाबरून पळून जाताना रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरस्वार ठार झाल्याची घटना.
खुलताबाद : बाजारसावंगी – इंदापूर रस्त्यावर नवविवाहितेला पळवून घेऊन जाण्याचा कट वऱ्हाडी मंडळीच्या सतर्कतेमुळे उधळून लावला. या घटनेत अपहरणकर्त्यांनी घाबरून पळून जाताना रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरस्वार पंडित केरुबा भालेराव (वय ५२, रा. इंदापूर) यांना जोरदार धडक मारली. उपचार सुरू असताना पंडित भालेराव यांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बिल्डा येथील उपसरपंचांचाही समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पिशोर येथून लग्न लावून लग्नाचे वऱ्हाड बाजारसावंगी येथे परत असताना नवरदेव – नवरीच्या वाहनाचा पाठलाग करून नवविवाहितेच्या अपहरणाचा प्रयत्न वऱ्हाडी मंडळीच्या सतर्कतेमुळे ग्रामस्थांनी हाणून पाडला. ही घटना खुलताबाद तालुक्यातील इंदापूर बाजारसावंगी रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव हे पोलिस फाट्यासह घटनास्थळी पोहोचले.
या प्रकरणी आकाश मते, ज्ञानेश्वर मते, एजाज अयुब शहा (सर्व रा. बिल्डा, ता. फुलंब्री), कासिफ असिफ खान (रा. फुलंब्री), रोहित बाळू भालेराव (रा. इंदापूर, ता. खुलताबाद), विनोद कसारे (रा. फुलंब्री) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक धनंजय फराटे पुढील तपास करीत आहेत.
शुक्रवारी बाजारसावंगी येथील एका तरुणाचे लग्न समारंभ आटोपून ते बाजारसावंगीकडे येत असताना बाजारसावंगी – इंदापूर रस्त्यावर जय भवानी मंगल कार्यालयासमोर पांढऱ्या रंगाची कार नवरदेवाच्या वाहनाला आडवी लावली. यातील संशयित आरोपींनी कट रचून गाडीतून नवरीला बाहेर ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्याने मारहाण केली. अपहरणकर्त्यांच्या वाहनाने बाजारसावंगीकडून इंदापूरकडे आठवडी बाजारातून बाजार घेऊन जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.
Breaking News: Groom’s car carrying bride blocked, shocking incident due to old love affair