Breaking News | Nashik Crime: ग्रामपंचायतीची जागा बेघर व्यक्तिच्या नावावर करून देत त्याबदल्यात बक्षिसी म्हणून तीन हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.
नाशिक: ग्रामपंचायतीची जागा बेघर व्यक्तिच्या नावावर करून देत त्याबदल्यात बक्षिसी म्हणून तीन हजारांची लाच स्वीकारताना जळगाव ग्रामपंचायतीचा (ता. निफाड) ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. याप्रकरणी निफाड पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण दौलत काकीपुरे (३८, रा. रो-हाऊस ५, साई रेसिडन्सी, स्वामी समर्थ मंदिराजवळ, मखमलाबाद, नाशिक) असे संशयित ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदार गणेश निरभवणे यांच्या वडिलांच्या मालकीचे जळगांव ग्रामपंचायत हद्दीतील घरालगत जळगांव ग्रामपंचायतीची बख्खळ जागा होती. ही जागा निरभवणे यांचे बेघर म्हणुन नावे करून देण्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणुन काकीपुरे यांनी बुधवारी (दि. १९) पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र यासंदर्भात निरभवणे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहनिशा केल्यानंतर गुरुवारी (दि. २०) जळगाव ग्रामपंचायतीच्या परिसरात सापळा रचला. त्यानुसार तक्रारदाराकडून लाचखोर काकीपुरे याने तीन हजारांची लाच स्वीकारली. त्यावेळी दबा धरून असलेल्या लाचलुचपतच्या पथकाने ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक केली.
याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या सूचनेने पोलीस निरीक्षक नितीन पाटील, विनोद चौधरी, अनिल गांगोडे, परशुराम जाधव यांनी सापळा यशस्वी केला.
Web Title: Gramsevak caught in the net while taking bribe