अहिल्यानगर: महिलेवर सामूहिक अत्याचार, चौघांवर गुन्हा, एकाला अटक
Breaking News | Ahilyanagar Crime: घरात घुसून लाकडी दांडक्याने मारहाण करत विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
अहिल्यानगर : जुन्या वादातून घरात घुसून लाकडी दांडक्याने मारहाण करत विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. १४) रात्री अकरा वाजेच्या सुमारास अहिल्यानगरमध्ये घडला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात मंगळवारी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दाळखुश काळे, अक्षय काळे, विनेश काळे, मोनेश टाटा चव्हाण (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. यातील दाळखुश काळे यास अटक करण्यात आली आहे. याबाबत विवाहितेने फिर्याद दिली आहे. आरोपी व विवाहिता यांच्यात वाद होते. या वादातून ते पीडितेच्या आई-वडिलांना त्रास द्यायचे. सोमवारी रात्री आरोपी दाळखुश काळे व त्याची दोन मुले व जावई, असे चौघेजण पीडितेच्या घरी आले. त्यावेळी त्यांचे पती घरी नव्हते. तरीही आरोपी घरात घुसले व त्यांनी शिवीगाळ करत पीडितेस लाथाबुक्यांनी मारहाण केली. दाळखुश याच्याकडे लाकडी दांडके होते. त्याने मारहाण करत पीडितेवर अत्याचार केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक अमोल भारती यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीला अटक केली आहे. इतर संशयितांचा शोध सुरू असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत.
Breaking News: Gang rape of woman, four charged, one arrested