काँग्रेसचे माजी आमदार शिवसेना (शिंदे) पक्षात, संजय राउत म्हणाले….
Sanjay Raut on Ravindra Dhangekar: एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट किंवा भाजपामध्ये सुरू असलेले पक्षप्रवेश हे भीतीपोटी सुरू.
पुणे: पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी (दि. १० मार्च) शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षांतराचे कारण सांगत मोठे विधान केले आहे.
“धंगेकर सदगृहस्थ आहेत. विकासकामे होत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सांगून त्यांनी शिवसेना (शिंदे) गटात जाण्याचा निर्णय घेतला. पण या पक्षात गेल्यामुळे कोणती विकासकामे मार्गी लागणार आहेत? हे समजायला मार्ग नाही. त्यांची व्यावसायिक कोंडी केल्याची आमची माहिती आहे”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट किंवा भाजपामध्ये सुरू असलेले पक्षप्रवेश हे भीतीपोटी सुरू आहेत. स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी भीतीपोटीच पक्षांतर केले होते. अजित पवार आणि त्यांच्या साथीदारांनीही याच भीतीपोटी पक्ष सोडला. एखाद्याने पक्षप्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जाते. जुन्या प्रकरणांवरून दबाव आणला जातो. रवींद्र धंगेकर यांनी पक्षांतर का केले? हे त्यांनी त्यांच्या दैवताला स्मरून सांगितले पाहिजे. कसबा विधानसभेतील गणेश पेठेत एक जमीन त्यांची पत्नी प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर भागीदार यांच्या नावावर आहे. त्या जागेची आजची किंमत ६० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. ही जागा विकासासाठी ताब्यात घेतल्यानतंर लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाच्या वतीने सदर जमीन वक्फ बोर्डाची असल्याचे सांगून न्यायालयात धाव घेण्यात आली. या माध्यमातून धंगेकर यांचे काम अडविण्यात आले आहे.
धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण करण्यात आली. धंगेकर यांनी पक्ष सोडावा, असे वातावरण तयार करण्यात आले. इतकी मोठी गुंतवणूक करूनही जर खटले दाखल होत असतील, पत्नीला अटक होणार असेल तर त्या भीतीपोटी आमचे प्रिय रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) शिंदे गटाला प्यारे झाले. फक्त धंगेकरच नाही तर यापूर्वी ९० टक्के प्रकरणात भीतीपोटी पक्षांतर झालेले आहेत”, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केली.
Web Title: Former Congress MLA joins Shiv Sena says Sanjay Raut