प्रवरेलाही आला पूर : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Nilwande Dam: निळवंडे धरणातून १५ हजार २७५ क्युसेकने पाणी नदी पात्रात कोसळत (Flood) आहे.
अकोले : राजूर परिसराबरोबरच निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी रात्री झालेल्या धुवाधार पावसाने खरिपातील पिकांना जोरदार तडाखा दिला. निळवंडेच्या पाणलोटात झालेल्या या पावसामुळे या धरणात नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली होती. धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवारी या धरणातून १५ हजार २४७ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. धरणाच्या इतिहासात ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे प्रवरेलाही पूर आला आहे.
निळवंडे पाणलोट क्षेत्रात व परिसरात झालेल्या या मोठ्या पावसामुळे ओढ्या नाल्यांना मोठा पूर आला होता. हे सर्व पाणी निळवंडे धरणात येत असल्याने शनिवारी सकाळी निळवंडे धरणातून १५ हजार क्युसेकहून अधिक प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली.
यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या पडली. गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभर पावसामुळे पूर्णपणे विश्रांती घेतली होती आणि आज पाऊस येणार नाही, असा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला होता.
मात्र रात्री दहानंतर पावसास सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली तो पहाटेपर्यंत त्याचा जोर कायम होता.
या पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या व उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे बांध फुटल्याच्या घटनाही घडल्या.
दरम्यान, भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही ऑक्टोबर महिन्यात पाच इंचाहून अधिक पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे १३४ मिमी, घाटघर येथे १२५, भंडारदरा ११९, निळवंडे १०९ तर वाकी येथे ८२ मिमी पाऊस कोसळला.
Web Title: Flood also hit Pravara Vigilance alert for riverside villages