अहमदनगर: वेल्डींग करताना गॅसचा भडका; तरुणाचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: गॅसचा भडका झाल्याने जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू, वेल्डींग दुकानदाराविरोधात गुन्हा.
अहमदनगर: वेल्डींगचे काम करत असताना गॅसचा भडका झाल्याने जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रशांत रामभाऊ गायकवाड (वय ४० रा. सोनेवाडी रस्ता, लोंढे मळा, केडगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. केडगाव येथील अनुराज वेल्डींग वर्क्स येथे ही घटना घडली असून याप्रकरणी अनुराज वेल्डींग वर्क्सचा मालक बिभिसेन सोमनाथ कातखडे याच्या विरोधात गुरूवारी (दि. ४) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मयत प्रशांत यांची पत्नी उज्ज्वला प्रशांत गायकवाड (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. प्रशांत गायकवाड यांची १३ डिसेंबर रोजी तब्येत ठिक नसतानाही बिभिसेन कातखडे याने त्यांना वारंवार फोन करून अनुराज वेल्डींग वर्क्स केडगाव येथे गॅस वेल्डींगचे काम करण्यासाठी बोलून घेतले. प्रशांत गायकवाड तेथे गेल्यानंतर वेल्डींगचे काम करत असताना गॅसचा भडका झाल्याने त्यामध्ये ते भाजून गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा २३ डिसेंबर रोजी मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बिभिसेन कातखडे याने प्रशांत गायकवाड यांना कुठल्याही प्रकारची संरक्षणासाठी लागणारी साधने दिली नव्हती. सोमनाथ कातखडे यांच्या हलगर्जीपणामुळेच गॅसचा भडका होऊन प्रशांत यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Title: Flare of gas during welding Death of a young man
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News