अहमदनगर: विजेच्या तुटलेल्या तारेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: शेतामध्ये तुटलेल्या तारांमुळे विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना.
अहमदनगर: नगर तालुक्यातील जेऊर येथे शेतामध्ये तुटलेल्या तारांमुळे विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर याच ठिकाणी गायही दगावल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. ५) घडली. जेऊरच्या खारोळी नदीलगत ठोंबरे वस्ती रोहित्रावरील विजेची तार तुटून शेतामध्ये पडलेली होती. येथे शेतामध्ये काम करत असताना तुटलेल्या तारेवर पाय पडल्याने शेतकरी पिराजी पांडुरंग पाटोळे (वय ५५) यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. याच जागेवर संजय पाटोळे यांची गायही दगावली.
विजेचा धक्का लागून पिराजी पाटोळे यांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. पाटोळे यांच्यावरील अंत्यसंस्कार जेऊर महावितरण कंपनीच्या दारात करण्याची भूमिका नागरिकांनी घेतल्याने वातावरण तणावग्रस्त बनले होते. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे हवालदार सुशांत दिवटे, कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर तांदळे यांनी जमावाला शांत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनास्थळावर महावितरण कंपनीचे अधिकारी येत नसल्याने नागरिकांचा राग अनावर झाला होता. यापूर्वी महावितरण कंपनीच्या बाह्यस्रोत कर्मचाऱ्याचा कार्यालयाच्या परिसरातच विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता, तसेच इमामपूर, बहिरवाडी येथे बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना विजेचा शॉक लागून जखमी झाल्याची घटना घडली होती. लिगाडे वस्तीवरील मुलीलाही विजेचा शॉक लागून जखमी झाली होती. याचबरोबर, गोरक्षनाथ तोडमल, विकास म्हस्के, रमेश पवार यांच्या गायी विजेच्या धक्क्याने दगावल्या आहेत. मृत गाईचे शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी प्रज्ञा कराळे यांनी केले. मयत पिराजी पाटोळे हे ग्रामपंचायतचे माजी सदस्य होते.
दरम्यान तुटलेल्या तारांची माहिती महावितरण कंपनीच्या कार्यालयात देऊनही आठ दिवसांपासून त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत होता. जेऊर महावितरण कंपनी कार्यालयात सावळा गोंधळ सुरू असून वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोपही नागरिकांकडून यावेळी करण्यात आला.
Web Title: Farmer dies due to electric shock
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study