एकनाथ शिंदे यांचा काँग्रेससह महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
Breaking News | Akole: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल.
अकोले: आदिवासी समाजाच्या विविध मुद्द्यांवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. आदिवासींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जुन्या कायद्यांमध्ये केंद्र सरकारनं बदल केल्याची आठवण शिंदे यांनी करुन दिली. आदिवासींना कायम आदिवासी ठेवावं हे काँग्रेसचं धोरण आम्ही बदलून टाकलं आणि आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आम्ही केल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
“आदिवासी समाजातील आपल्या भगिनी द्रौपदी मुर्मू यांना देशाचं राष्ट्रपती हे सर्वोच्च पद दिलं. आज राष्ट्रपतीपदावर कोण आहे? तर आपल्या आदिवासी बहीण आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समोर काँग्रेसने आपला उमेदवार दिला आणि त्यांनाही काँग्रेसने अपमानित केलं,” अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी ‘जागतिक आदिवासी दिना’निमित्त अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं संविधान बदलणार, आदिवासी समाजाचं आरक्षण जाणार असा फेक नॅरेटिव्ह पसरवून आदिवासी समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. “त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार म्हणून मुख्यमंत्रीपासून सगळेच खातेवाटप करून टाकले होते. विधानसभा निवडणूक आपण जिंकणार आणि यांना (एकनाथ शिंदे) जेलमध्ये टाकू, बर्फाच्या लादीवर झोपवू हे सगळं ते बोलले. मात्र, माझ्या आदिवासी समाजातील लाडक्या बहिणींनी त्यांच्या चारी मुंड्या चित करून टाकल्या. महाविकास आघाडीला घरी पाठवून दिलं,” अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना करुन दिली.
शिवसेना ज्यावेळी काँग्रेसच्या जोखडात बांधायला घेतली, त्यावेळी बंड आणि उठाव केला. 2022 साली राज्यातील सरकार पाडून टाकलं. त्यानंतर टांगा पलटी, घोडे फरार अशी त्यांची परिस्थिती झाली. विधानसभेला आम्ही 80 जागा लढलो. त्यापैकी 60 जागा जिंकलो. ज्यांनी आमच्यावर टीका केली की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही, त्यांनी 100 जागा लढवल्या आणि फक्त 20 जागा जिंकल्या,” अशी जोरदार टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर केली.
Breaking News: Eknath Shinde makes serious allegations against Mahavikas Aghadi