एकनाथ शिंदेंना नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; बैठकीत नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: शिंदे गटाच्या वाट्याला 13 ते 14 मंत्रीपदं येणार असल्याची माहिती.
मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधीनंतर आता सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये काही मंत्रिपदांच्या तिढ्यामुळे विस्तार रखडला होता. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गेले होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीअंती शिवसेनेला नगरविकास खाते मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार होते. मात्र, काही कारणामुळे त्यांना या बैठकीला जात आले नाही. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून त्यांचे एकनाथ यांच्याशी बोलणे करुन दिले. यावेळी मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांबाबत चर्चा झाल्याचे समजते.
ठाण्यातील या बैठकीनंतर शिवसेनेला 12 मंत्रीपदं आणि उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदांसाठी बरेच दिवस प्रेशर गेम खेळला. याचा फायदा त्यांना झाल्याचे दिसत आहे. कारण शिंदे गटाच्या वाट्याला 13 ते 14 मंत्रीपदं येणार असल्याची माहिती आहे. जास्त मंत्रीपदं घेऊन एकनाथ शिंदे यांनी योग्य तो मेसेज दिल्याचेही सांगितले जात आहे. आता शिवसेनेसोबत चर्चा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चेला बसतील. भाजप-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळासंदर्भातील चर्चेची एक फेरी दिल्लीत पार पडण्याचीही शक्यता आहे. 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आगामी एक-दोन दिवसांत खातेवाटपही निश्चित होईल, असे सांगितले जात आहे.
Web Title: Eknath Shinde has a total of 13 ministerial posts including Urban Development
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study