संगमनेर: खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आठ जणांना अटक
Sangamner Murder Case: जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कट रचून त्याचे अपहरण केले व जखमी अवस्थेत प्रवरानदीत फेकून दिले.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील येठेवाडी येथील बाळू शिरोळे याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कट रचून त्याचे अपहरण केले व जखमी अवस्थेत प्रवरानदीत फेकून दिले. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पठारभागातील येठेवाडी येथील एक विवाहित महिला पती व मुलाबाळांना सोडून त्याच गावात राहणाऱ्या बाळू शिरोळे याच्यासोबत १८ वर्षांपूर्वी पळून गेली होती. त्यावेळी नऊ वर्षांच्या असलेल्या तिच्या मुलाला हा प्रकार खटकला होता. याची सल त्याच्या मनात होती. बुधवारी (१० ऑगस्ट) बाळू शिरोळे हा संगमनेरच्या न्यायालयात येणार असल्याची माहिती त्या महिलेच्या मुलाला समजली. त्यानुसार त्याने नातेवाईक व साथीदारांना सोबत घेत संगमनेरात आलेल्या बाळू शिरोळेचे अपहरण केले. त्याला वेल्हाळे शिवारातील एका शेतातील खोलीत डांबून ठेवले. सागर वाडगे, शिवाजी वाडगे (रा. येठेवाडी), संपत डोळझाके ( रा. साकुर), मनोज चव्हाण (रा. पेमगिरी), शुभम सुनील खताळ (रा. धांदरफळ) व दाऊ उर्फ दिनेश जेधे ( रा. घुलेवाडी) यांनी त्याला मारहाण केली. सागर व त्याचे वडील शिवाजी वाडगे या दोघांनी बाळू शिरोळेच्या डोक्यात दगडाने घाव घालून जखमी केले. अण्णा वाडगे याने तो अर्ध मेला झाला की नाही याची खात्री केली आणि त्यानंतर मनोज चव्हाण व शुभम खताळ यांना बाळू शिरोळे याला नदीत फेकून द्या असे सांगितले.
त्यानुसार बाळू शिरोळे याला बुधवारी रात्री कासारवाडी शिवारातील नदीत फेकून दिले. गुरुवारी याबाबतची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत नदीपात्रात फेकून देण्यात आलेल्या बाळू यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख हे स्वतः फिर्यादी झाले. सागर वाडगे, शिवाजी वाडगे, दत्ता वाडगे, अण्णा वाडगे (रा. येठेवाडी) ), संपत डोळझाके (रा. साकुर), मनोज चव्हाण (रा.पेमगिरी), शुभम खताळ (रा. धांदरफळ), दाऊ उर्फ दिनेश बाळू जेधे (रा. घुलेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
Web Title: Eight people arrested for attempted murder in Sangamner