अहिल्यानगर: मालट्रक लुटण्यासाठी ड्रायव्हरचा गळा चिरून खून
Breaking News | Ahilyanagar Crime: कर्नाटक येथून ट्रक मध्ये सुमारे 28 लाख रुपयांचा 42 टन हरभरा भरून तो खाली करण्यासाठी हरियाणा येथे जात असलेल्या चालकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना.
अहिल्यानगर: कर्नाटक येथून ट्रक मध्ये सुमारे 28 लाख रुपयांचा 42 टन हरभरा भरून तो खाली करण्यासाठी हरियाणा येथे जात असलेल्या चालकाचा (ड्रायव्हर) धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. अनुपसिंह गोपाळसिंह बालेचा (वय 43 रा. नोखा, जि. बिकानेर, राजस्थान) असे खून झालेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. नगर तालुक्यातील वाळुंज ते नारायणडोह जाणार्या बायपास रस्त्यावर नारायणडोह शिवारात मंगळवारी सकाळी ही घटना घडली.
दरम्यान, मालट्रक लुटीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. खून करणार्या दोघा संशयितांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
साहेबा आनंदा गायकवाड व उस्वाल इंपिरिअल चव्हाण (दोघे रा. वाळुंज, ता. नगर) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुपसिंह यांनी त्यांच्याकडील ट्रकमध्ये कर्नाटक येथून सुमारे 28 लाख रुपये किमतीचा 42 टन हरभरा भरला होता. तो हरभरा त्यांना हरीयाणा येथे खाली करायचा असल्याने ते अहिल्यानगर मार्गे हरीयाणाच्या दिशेने जात होते. दरम्यान, ते मंगळवारी सकाळी नारायणडोह शिवारात आल्यानंतर त्यांना दोघांनी अडविले. त्यांच्या ताब्यातील 28 लाख रुपयांचा हरभरा व 40 लाख रुपयांचा मालट्रक असा 68 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लुटण्यासाठी दोघांनी अनुपसिंह यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करून त्यांना ट्रकच्या खाली ढकलून दोघे लुटारू ट्रक घेऊन निघाले.
दरम्यान, ट्रक घेऊन जात असताना त्यांनी विद्युत वाहक पोलला धडक दिली. तसेच ट्रक चालकाचा खून करून ट्रक लुटला जात असल्याचे स्थानिकांच्या लक्ष्यात आले. त्यांनी हा सर्व प्रकार पोलीस अंमलदार गांगर्डे यांना फोन करून सांगितला. माहिती मिळताच नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपतराव भोसले, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरचा प्रकार लुटीच्या उद्देशाने केला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Web Title: Driver’s throat slit for robbing goods truck