अहमदनगर जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना शिवीगाळ, पोलिसांना धक्काबुक्की
अहमदनगर | Ahmednagar: रुग्णांना भेटण्याच्या कारणातून जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी चांगलाच राडा केला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांना शिवीगाळ करण्यात आली तसेच पोलिसांनादेखील धक्काबुक्की करण्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडला.
याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी सचिन श्याम बैद व कर्मचारी अमोल ज्ञानेश्वर बर्डे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात स्वतंत्ररित्या फिर्याद दाखल केली आहे. यावरून चंद्रकांत आनंद उजागरे रा. स्टेशन रोड अहमदनगर, संदीप उत्तम मरकड रा. मिरी ता. पाथर्डी यांच्यासह अनोळखी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने जिल्हा रुग्णालयात वाहने आणण्यास व रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना बंदी आहे. सोमवारी सायंकाळी उजागरे व मरकड यांच्यासह आठ दहा जण आम्हाला नातेवाईकांना भेटू द्या असा आग्रह केला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी भेटता येणार नाही असे सांगितले. यावेळी या जमावाने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयासमोर शिवीगाळ केली. महिला कर्मचारी यांनादेखील शिवीगाळ करण्यात आली. तोफखाना पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जमावाने राडा घालत पोलिसांनाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करत आहे.
Web Title: Doctors abused at Ahmednagar District Hospital