अहिल्यानगर: डिझेलचा टैंकर पलटी, डिझेलसाठी गर्दी
Breaking News | Ahilyanagar Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिझेलचा टैंकर पलटी.
अहिल्यानगर : नगर-पुणे महामार्गावरील चास गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिझेलचा टैंकर पलटी झाला. यावेळी संपूर्ण रस्त्यावर डिझेल सांडले होते. याप्रसंगी अपघातग्रस्त चालकाला मदत करण्याऐवजी परिसरातील ग्रामस्थांसह प्रवाशांनी डिझेल भरण्यासाठी ड्रम, टिपाड, दुधाचे कॅन, एव्हढेच नव्हे, तर पाण्याच्या बाटल्याही घेऊन अपघातस्थळी गर्दी केली होती. त्यामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडली. रविवारी (दि.१६) दुपारी २ वाजता ही घटना घडली.
नगर-पुणे महामर्गावर पुणेकडून नगरच्या दिशेने येणारा डिझेलचा टँकर रविवारी दुपारी चास गावाजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. हा टैंकर रस्त्यावर आडवा पडल्याने एका मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. यावेळी टँकरमधील डिझेल रस्त्यावर सांडले. हे सांडलेले डिझेल आणि टँकरमध्ये उरलेले डिझेल काढून घेण्यासाठी अवघ्या काही मिनिटांतच अपघातस्थळी तोबा गर्दी झाली. दरम्यान या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर घटनास्थळी तत्काळ अग्निशमन बंब रवाना करण्यात आला. सांडलेल्या डिझेलला आग लागू नये, यासाठी प्रथम बंबातून फॉग मारण्यात आला. त्यानंतर पाणी मारण्यात आले. डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांना अडचणी येत होत्या. दरम्यान या घटनेत चालक किरकोळ जखमी झाल्याचे समजते.
रस्त्यावर डिझेलचा टैंकर पलटी झाला, तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या दोन्ही बाजूने काही वाहनचालकांनी वाहन थांबून डिझेल मिळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तर एका रुग्णवाहिका चालकानेही रुग्णवाहिका थांबवून जवळ असलेल्या ड्रममध्ये डिझेल घेण्याची धडपड केली. विशेष म्हणजे डिझेल भरण्यासाठी काही महिलाही अपघातस्थळी प्रयत्न करताना दिसून आल्या.
२० हजार लीटर क्षमतेचा हा डिझेलचा टैंकर होता. यातील किती डिझेल रस्त्यावर सांडले हे समजू शकले नाही. मात्र डिझेल घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
डिझेलचा टैंकर पलटी झाला, तेव्हा अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूने दीड ते दोन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुणीच प्रयत्न केले नाही. मात्र, डिझेल मिळविण्यासाठी बहुतांशी जण धडपडताना दिसले. नगर तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही वेळाने ही वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Web Title: Diesel tanker overturns, rush for diesel