अकोलेत बंद घरात आढळला मृतावस्थेत बिबट्या, नेमकं कारण काय?
Akole News: घरात एक-दीड वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत गुरुवार सकाळी आढळला. (dead leopard )
अकोले: अकोले शहराजवळ नवीन नवलेवाडी येथे दुबळकुंडी रोडवर मध्य वस्तीत हा प्रकार समोर आला आहे. नवीन नवलेवाडी इथं वर्दळीच्या रस्त्यालगत एक जुने पडके घर आहे. या घरात एक-दीड वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत गुरुवार सकाळी आढळला. दोन-तीन दिवसांपूर्वीच तो मयत झाला असावा.
बुधवारी महाशिवरात्र असल्याने रस्त्याने वर्दळ होती. पण, या बंद घराजवळची दुकाने बंद होती. गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान या घरातून दुर्गंधी सुटल्याची बाब शेजारी संतोष काठे व किसन चौधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी दरवाजातून आत डोकावून पाहिले तर मृत बिबट दिसला. माजी उपसरपंच राकेश देशमुख यांनी वनखात्यास ही बाब कळवली. वनकर्मचारी रामहारी आंबरे, सूर्यभान नरवडे यांनी नागरिकांच्या मदतीने बिबट्यास सुगाव वन रोपवाटिकेत नेले. शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर बिबट मृत्यूचे खरे कारण समजेल असे वनरक्षक अंकुश काकड यांनी सांगितले.
प्राथमिक कारण:
बंद घरात घुसण्यासाठी पाठीमागून छोटी जागा होती. तेथून बिबट्या आत घुसला. पण, बिबट्या आत घुसताना तेथे काही अडगळीचे सामान होते ते खाली पडले व हा रस्ता बंद झाला. त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. या घराशेजारी कुक्कुटपालन असल्याने तेथील पक्षांचा आवाज सुरु असतो. त्यामुळे या बिबट्याने डरकाळी फोडल्यानंतरही त्याचा आवाज बाहेर कुणालाही आला नाही. जास्त दिवस आत राहिल्याने पाणी व अन्न न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज आहे.
Web Title: dead leopard was found in a closed house in Akolet