अहमदनगर: विवाहितेचा मृतदेह आढळला, नेमकी आत्महत्या की घातपात?
Ahmednagar | Rahuri | राहुरी: राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे विवाहित महिला सासरच्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मयत (Dead body) आढळून आली. सारा ऊर्फ सोनी प्रसाद शिरसाठ (वय 26) असे मृत अवस्थेत आढळून आलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे ब्राम्हणी परिसरात खळबळ उडाली आहे.
काल सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विवाहिता तिच्या सासरच्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळून आल्याने तिला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
दरम्यान, साराच्या मृतदेहाचे राहुरी येथे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला. याप्रकरणी रात्री राहुरी पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती प्रसाद पावलस शिरसाठ, सासू लता पावलस शिरसाठ, सासरा पावलस वामन शिरसाठ, दीर प्रतीक पावलस शिरसाठ, पंकज पावलस शिरसाठ, नणंद पल्लवी प्रवीण चक्रनारायण या सहाजणांवर राहुरी पोलीस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरकडील नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी गर्दी करून राहुरी पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते.
सारा ऊर्फ सोनी शिरसाठ हीचे माहेर राहुरी फॅक्टरी येथील असून सुमारे सात ते आठ वर्षापूर्वी तिचा विवाह राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील प्रसाद शिरसाठ याच्याबरोबर झाला होता. लग्नानंतर काही महिन्याने सारा ऊर्फ सोनी हिचा सासरा, सासू, दीर व नणंद यांनी तिचा वेगवेगळ्या कारणावरून छळ सुरू केला.
अशा परिस्थितीत काल बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या तरूण विवाहितेचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. मात्र, तिचा घातपात केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या कुटुंबियांनी केला असून तिने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या सासरकडील कुटुंबियांनी केला आहे.
मात्र, विवाहितेच्या मृत्यूचे गूढ वाढले असून याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेचा मृतदेह खासगी वाहनातून राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. या घटनेची खबर स्थानिक पोलिसांना देण्यात आली नव्हती, अशी चर्चा सुरू आहे.
तर विवाहिता आजारी असल्याचा निरोप सासर्याने तिच्या माहेरच्या नातेवाईकांना दिला, अशी चर्चा होत आहे. माहिती मिळताच माहेरच्या नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली. तिचा मृतदेह पाहून मोठा आक्रोश केला. दरम्यान, रूग्णालयात दोन्हीबाजूंनी वाद सुरू झाल्याने वातावरण काहीकाळ तंग झाले.
विवाहितेचा मृतदेह काल सकाळी बारा वाजता राहुरी येथील शवविच्छेदन गृहात आणण्यात आला. मात्र, चार तासानंतरही तिचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. मृतदेहाची हेळसांड झाल्याने तेथे उपस्थित असलेल्या शोकाकुल नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला.
Web Title: Dead body of a married woman was found