नाशिक शिक्षक मतदारसंघात दराडे आघाडीवर
Breaking News | Nashik Constituency Election: विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी प्रथम पसंतीच्या मतांत ९ हजार १०४ मतांनी आघाडी.
नाशिक : लोकसभा निकालानंतर सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी प्रथम पसंतीच्या मतांत ९ हजार १०४ मतांनी आघाडी घेतली आहे. विवेक कोल्हे दुसऱ्या स्थानावर आहेत. मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
एकूण ६३ हजार १५१ मते वैध ठरल्याने ३१ हजार ५७६ मतांचा कोटा विजयासाठी निश्चित करण्यात आला. १७०२ मते अवैध ठरली. प्रथम पसंतीत किशोर दराडे यांना २६ हजार ४७६ तर अपक्ष विवेक कोल्हे यांना १७ हजार ३७२ मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना १६ हजार २८० मते मिळाली.
पहिल्या पसंतीच्या तीन फेऱ्यांनंतर कोटा पद्धत ठरविण्यासाठी बाद मते वगळण्यात आली. विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी दराडे यांना ५ हजार १०० मतांची गरज होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू होती. दुसऱ्या पसंतीत कुणाला अधिक मते आहेत यावर विजयाचे गणित ठरणार आहे. नगरचे भाऊसाहेब कचरे यांना प्रथम पसंतीत १ हजार १९५, तर आप्पासाहेब शिंदे यांना २५९ मते मिळाली. सोमवारी सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर निकाल येण्याची शक्यता होती.
मुंबई पदवीधर, ‘शिक्षक’ वर उद्धवसेनेचा कब्जा
अनिल परब, अभ्यंकर विजयी; कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे यांची हॅट्ट्रिक
नवी मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने बाजी मारली आहे. पदवीधर मतदारसंघातून उद्धवसेनेचे अनिल परब हे विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदेसेनेचे किरण शेलार यांचा २६,०१२ मतांनी पराभव केला, तर शिक्षक
मतदारसंघातून उद्धवसेनेचे ज. मो. अभ्यंकर यांनी शिक्षक भारतीचे मोरे यांचा पराभव केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय संपादित करून विजयाची हॅट्ट्रिक साधली. शेवटच्या फेरीची मतमोजणी जाहीर होईपर्यंत डावखरे यांनी ६२ हजारांची आघाडी घेतली होती.
Web Title: Darade leading in Nashik teachers constituency
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study