Crime News: पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, १५ जणांवर गुन्हे दाखल
पाथर्डी| Pathardi | Crime News: मोहटादेवीगड पायथ्याला शनिवारी रात्री मोहटादेवीच्या पालखी सोहळ्याच्यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने दोन मुख्य संशयितांसह इतर दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्री क्षेत्र मोहटादेवी गडावरील शारदीय नवरात्रोत्सव संपल्या नंतर मोहटादेवीची मोहटे गाव ते देवीगड अशी मिरवणूक काढण्यात येत असते. त्याप्रमाणे काल रात्री ही मिरवणूक काढण्यास सुरुवात झाली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .यावेळी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, प्रवीण पाटील हे मोहटादेवी गड पायथ्याला फौजफाटा घेऊन गेले असता त्याठिकाणी जवळपास शंभरजण बँडच्या तालावर नाचत असल्याचे पाहून पो.नि.चव्हाण यांनी पोलीस गाडीच्या स्पीकर वरून आवाहन करण्यात आले की, जिल्हाधिकार्यांनी जमावबंदी आदेश लागू केला असल्याने मोठ्या संख्येने थांबलेल्या लोकांनी निघून जावे तसेच करोना नियमाचे पालन करावे. परंतु संशयित महादेव आसाराम दहिफळे व विठ्ठल आसाराम दहिफळे यांनी चव्हाण व इतर पोलीस कर्मचार्यांना आम्ही येथून जाणार नाही व कोणालाही जाऊ देणार नाही, तुम्ही आम्हाला कोण आडवणार असे म्हणून चव्हाण व इतर पोलीस कर्मचार्यांशी झटापट केली.
यावेळी पोलिसांनी महादेव दहिफळे यास पकडून ठेवले मात्र घटनास्थळी जमलेल्या इतर दहा ते पंधरा व्यक्तींनी विठ्ठल दहिफळे यास पळून जाण्यास मदत केली. .यानंतर चव्हाण यांनी महादेव दहिफळे व विठ्ठल दहिफळे यांच्यासह घटनास्थळी उपस्थित असलेल्या १० ते १५ व्यक्तींविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी महादेव दहिफळे याला अटक केली आहे.
Web Title: Crime News Pathardi Pushback to police officers