धक्कादायक: गुण वाढवून देतो असे म्हणत विद्यार्थिनीकडे केली शरीरसुखाची मागणी
पुणे | Crime News: बारावीच्या परीक्षेत गुण वाढवून देतो असे सांगून एका विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाची पालकांनी तोंडाला काळे फासून धिंड काढल्याचा प्रकार बुधवारी पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या माध्यमातून गुण देण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकावर सोपविण्यात आली आहे. मात्र याचाच गैरफायदा पुण्यातील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकाने घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
बारावीच्या परीक्षेत तुला गुण वाढवून देतो असे सांगून अभिजित पवार हा एका मुलीकडे शरीरसुखाची मागणी करत होता. तो वारंवार अशा प्रकारे मागणी करत असल्यामुळे त्रस्त होऊन विद्यार्थिनी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होती. मात्र नकार देऊन देखील प्रकार सुरूच राहिल्यामुळे अखेर विद्यार्थिनीने शिक्षक अभिजित पवारने केलेला फोन रेकार्ड केला आणि आपल्या पालकांना व नातेवाईकांना ऐकविला.
पालकांना ही बाब समजल्यानंतर महाविद्यालय गाठले आणि या विकृत शिक्षकाच्या तोंडाला काळे फासून पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. हा प्रकार समोर आल्याने विद्यार्थी, पालक व संघटनानी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विश्रामबाग पोलिसांनी अभिजित पवार यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime News Demand for physical comfort from the student