अकोले तालुक्यात रेशनचा काळाबाजार पुन्हा एकदा उघडकीस, दोघांवर गुन्हा दाखल
अकोले | Akole | Crime News: अकोले तालुक्यातील शहरालगत नवलेवाडी परिसरात एका घरात अवैध धान्यसाठा आढळून आल्याने सुरु असणारा रेशन धान्याचा काळाबाजार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. याबाबत अकोले पुरवठा निरीक्षक सतीशकुमार थारकर यांच्या फिर्यादीवरून दत्ता सुदामराव चोथवे रा. राजूर व चालक खंडू काशिनाथ भारमल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोले शहराललगतच्या नवलेवाडी परिसरात रात्रीच्या वेळेला एके ठिकाणी रेशनच्या धान्य पोत्यातील धान्य अन्य पोत्यात भरता असल्याचे भाजप कार्यकर्ते यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रशासनाला ही याबाबत माहिती दिली.
तहसीलदार सतीश थेटे, सहा पोलीस निरीक्षक मिथुन घुगे,मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे, तलाठी प्रवीण ढोले व अन्य संबंधित कर्मचाऱ्यांनी घटनेची समक्ष पाहणी केली. सकाळी या घटनेचा पंचनामा करण्यात आला. या ठिकाणी रेशन तांदळाच्या भरलेल्या 75 गोण्या,खाकी बारदानाच्या रिकाम्या 158 गोण्या, सरकारी धान्य वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 26 सफेद गोण्या, नर्मदा पोल्ट्री फीड कंपनीचे नाव असलेल्या रिकाम्या 200 गोण्या, तसेच घराचे पूर्व बाजुला उभ्या असणाऱ्या सफेद रंगाच्या आयशर कंपनीचा एम एच 17,बी वाय-3518 या टेम्पोमध्ये नर्मदा पोल्ट्री फीड कंपनीचे नाव असलेल्या 107 गोण्या आढळून आल्या. शासकीय रेशन धान्य दुकानासाठी वरल्या जाणाऱ्या खाकी 300 रिकाम्या गोण्या मिळून आल्या. प्रमोद नवले यांचे हे घर आहे. त्यांनी ते राजूर येथील दत्ता चोथवे यांना भाड्याने दिलेले आहे. चोथवे यांचा धान्याचा व्यापार असल्याचे त्यांनी नवले यांना सांगितले होते. यासंदर्भात माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तहसीलदार थेटे व सहा. पो नि घुगे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
अकोले पोलीस ठाण्यात सतीश थारकर यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की, २ नोव्हेंबर २०२१ रोजी नवलेवाडी येथे अवैध धान्यसाठा असल्याची माहिती मिळाली नवलेवाडी येथे प्रत्यक्ष जावून पहिले असता भाड्याने घेतलेया पत्र्याच्या शेडमध्ये दत्ता सुदामराव चोथवे व आयशर गाडी चालक खंडू काशिनाथ भारमल रा. राजूर यांनी महाराष्ट्र शासनाने मोफत वितरणासाठी दिलेल्या तांदळाच्या गोण्यांची जागेवर आदलाबदली करून सदर तांदूळ हे अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगले व घटनास्थळावरून पसार झाले असून यावेळी पत्र्याच्या खोलीत एक लाख १२ हजार ५०० रुपयांची महाराष्ट्र शासन नाव असलेली खाली रंगाचे बारदानातील ७५ गोणी तांदूळ, १ लाख ६० हजार रुपयांचा आयशर टेम्पोमध्ये असलेले सफेद रंगाचे बारदान असलेली १०७ गोनी तांदूळ व महाराष्ट्र शासन नाव असलेल्या ४५८ व सफेद रंगाचे २२६ अशा एकूण ६८४ रिकाम्या गोण्या व आयशर टेम्पो सह एकूण ९ लाख ८० हजार ७८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे म्हंटले आहे. आरोपींविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाले आहेत.
Web Title: Crime News black market of rations in Akole taluka has been exposed once again