Home कोल्हापूर हृदयदायक! दिवाळीचा बाजार करून घरी परतणारे दाम्पत्य अपघातात ठार, मुली पोरक्या

हृदयदायक! दिवाळीचा बाजार करून घरी परतणारे दाम्पत्य अपघातात ठार, मुली पोरक्या

Kolhapur Accident: दिवाळीचा बाजार करून घरी परतणारे दांपत्य काल येथे झालेल्या अपघातात ठार.

Couple returning home from Diwali bazaar killed in accident

राशिवडे बुद्रुक : दिवाळीचा बाजार करून घरी परतणारे दांपत्य काल येथे झालेल्या अपघातात ठार झाले. येळवडे (ता. राधानगरी) ते राशिवडेदरम्यान टेम्पो आणि दुचाकी यांच्यात धडक झाली. त्यात संजय वसंत कांबळे (वय ४८) व त्यांची पत्नी सुरेखा (४०, दोघे रा. पुंगाव, ता. राधानगरी) ठार झाले. सायंकाळी सातच्या सुमारास अपघात झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  संजय सेंट्रिंग व्यवसाय करत होते. त्यांच्या पत्नी सुरेखा या भोगावती-परिते येथे एका दुकानात कामाला होत्या. दररोज सायंकाळी ते पत्नीला आणायला जात होते. दोघे आज दिवाळीचा बाजार करून दुचाकी (एमएच ०९-ए. एम. १७५८) वरून घरी येत होते. राशिवडे-येळवडेच्या सीमेवर आल्यानंतर येळवडेकडून माल उतरून राशिवडेकडे निघालेला टेम्पो (एमएच ०९-८६२९) ची त्यांना जोराची धडक बसली.

धडक इतकी जोरदार होती की त्यांना सुमारे २५ ते ३० फूट फरपटत नेऊन टेम्पो उजव्या बाजूला नाल्यात उलटला. नाल्याच्या बाजूला असलेला विजेचा खांबही मोडला. टेम्पोचालक नामदेव परीट (रा. राशिवडे) याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. अपघातात डोके टेम्पोवर आदळल्याने संजय जागीच ठार झाले. दुचाकीच्या मागे बसलेल्या सुरेखा यांना पोट व कमरेला जोरदार मार बसला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सोळांकुर आणि सीपीआरमध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर दांपत्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलींचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा ठरला.

दिवाळी आणि घरी नातवंडं अशा आनंदात असलेल्या पती-पत्नीवर काळाने घाला घातला. दोघेही मनमिळावू व कष्टाळू होते. संजय यांनी आजच ऊसतोडीवर दोन हजार रुपये उचल घेतली व दिवाळीचे साहित्य खरेदी केले होते. आकाश कंदील आणि पणत्या घेऊन ते परतत होते. अपघातस्थळी सारे साहित्य विखुरले होते

या दांपत्याला चार मुली आहेत. पैकी एकीचा विवाह झाला आहे. ती बाळंतपणासाठी माहेरी आहे. उर्वरित तीनपैकी एक पाचवीला, एक आठवीला, तर एक बारावीमध्ये शिकत आहे. दोघे कर्तेच गेल्याने कांबळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मुलीही पोरक्या झाल्या. आता त्यांना अंध असलेल्या वृद्ध आजीचाच आधार आहे.

Web Title: Couple returning home from Diwali bazaar killed in accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here