तांबे पिता पुत्रांनी कॉंग्रेसशी दगाफटका केलाय, सत्यजित तांबे यांना पाठींबा नाही- नाना पटोले
कॉंग्रेस पक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe)यांना पाठींबा देणार नाही अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नागपूर : डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. ही पक्षासोबत फसवेगिरी आहे. तर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात आज दिली.
कॉंग्रेस पक्ष सत्यजित तांबे यांना पाठींबा देणार नाही अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने एबी फॉर्म दिला असताना देखील डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तेथे अपक्ष म्हणून त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अर्ज भरला आहे. भाजपने या निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. इकडे सत्यजीत तांबे अपक्ष नामांकन दाखल करतात आणि भाजपचा पाठिंबा मागतात. याचा अर्थ हे सर्व आधी ठरलेले होते. हा धोका पक्ष विसरणार नाही आणि ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. या निवडणुकीत पदवीधर लोक मतदार आहेत आणि ते काही मूर्ख नाहीत. त्यांनाही कळते की दगाफटका करणाऱ्यांसोबत यशस्वी होणार नाही. असे नाना पटोले म्हणाले.
या मतदारसंघातून काँग्रेसने म्हणजेच महाविकास आघाडीने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. प्रत्यक्षात ऐनवेळी डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही. तर त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
तांबे यांना काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे भाजपची ऑफर दिली होती. तेव्हापासून सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. यानंतरही काँग्रेसने डॉ. तांबे यांना उमेदवारी दिली आणि शेवटी हे नाट्य झाले.
भाजप दुसऱ्याची घरे फोडतोय नाना पटोले
‘सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरून भाजपचा पाठिंबा मागणे, हे सर्वकाही पूर्वनियोजित होते. या भागातील पदवीधर लोक अडाणी नाहीत. भाजपकडून लोकांना भय दाखवून घरे फोडण्याचे काम सुरु आहे. आज भाजपला या सगळ्याचा आनंद वाटत आहे. भाजपच्या प्रमुखांची वक्तव्ये पाहता त्यांना या सगळ्याचा आनंद वाटतोय. पण एक दिवस भाजपचे घर फुटेल तेव्हा त्यांना दु:ख कळेल’, असे नाना पटोले यांनी म्हटले.
दरम्यान या संपूर्ण घटनेत तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेसला धक्का दिल्याचे मानले जात आहे. तसेच काँग्रेस नेत्यांच्या गाफीलपणावर आणि निर्णय प्रक्रियेवरही बोट ठेवले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना महाविकास आघाडीतील इतर घटकपक्ष या प्रक्रियेपासून दूरच होते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात काहीही भाग घेतल्याचे दिसून आले नाही. ही घटना घडल्यानंतरही काही काळ केवळ भाजप आणि काँग्रेसचे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
Web Title: Congress does not support Satyajeet Tambe Nana Patole
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App