संगमनेरच्या राजकारणात विखे आणि थोरात संघर्ष पुन्हा एकदा उफाळणार
Breaking News | Sangamner Politics: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा राजकीय रंग गडद होत असून, पुन्हा एकदा विखे-थोरात संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली.
संगमनेर: तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा राजकीय रंग गडद होत असून, पुन्हा एकदा विखे-थोरात संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटावर आपलेच वर्चस्व राहील, असा ठाम दावा करत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट संदेश दिला आहे की, संगमनेरमध्ये कोणालाही हवेत जाऊ देणार नाही.
आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी आगामी निवडणुकांची रणनीती उलगडत पक्षातील कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, कोणालाही तिकीट देण्याची चर्चा स्थानिक पातळीवर करता कामा नये. सर्व निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली वरच्या स्तरावर घेतले जातील. कार्यकर्त्यांनी आपणच नगरसेवक किंवा सदस्य म्हणून पुढे येऊ नये, असा स्पष्ट सल्ला देताना ते म्हणाले, ज्यांनी स्वतःला भावी म्हणवून घेतलंय, ते फक्त संध्याकाळी चार लोकांत गोड बोलतात, पण वास्तवात त्यांचा काही उपयोग नाही. त्यामुळे भावी होण्याआधी कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करा, लोकांमध्ये काम पोहोचवा.
आपण सात-आठ महिन्यांपूर्वी जसे एकत्र आलो होतो, तसेच पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र यायचं आहे. आपण केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक प्रभागात पुन्हा एकदा लोकांचा विश्वास मिळवायचा आहे. दोन पक्ष वेगळे असले तरी आपण एकाच छताखाली आहोत आणि याच छताखाली सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. संगमनेर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही लढणार नाही, असा निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे. आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा क्षणिक नव्हे, तर प्रदीर्घ राजकीय भविष्यासाठी असतो, असे सांगत त्यांनी विरोधकांना एकप्रकारे इशाराच दिला.
या बैठकीतून एक गोष्ट निश्चित झाली की संगमनेरच्या राजकारणात विखे आणि थोरात गटांतील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या दोन्ही बाजू पुन्हा मैदानात उतरतील आणि राजकीय समीकरणे पुन्हा तापतील अशीच चिन्हे सध्या दिसत आहे.
Breaking News: conflict between Vikhe and Thorat in politics will flare up once again