काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आ. थोरातांच्या भूमिकेची प्रतीक्षा
Nashik Graduate Constituency Election | नाशिक पदवीधर निवडणुका: संगमनेरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था निर्माण, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली, नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.
अहमदनगर: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर प्रदेश काँग्रेसने आ. डॉ. सुधीर तांबे व सत्यजित तांबे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सुधीर तांबे यांचे निलंबन केल्यावर सत्यजित तांबे यांच्यावरही कारवाईचे संकेत दिले आहेत. या सर्व घडामोडींवर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे नगरच्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. आमदार थोरात यांच्या भूमिकेकडे या सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी मिळूनही अर्ज दाखल केला नाही. तर दुसरीकडे त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यातच त्यांनी भाजपकडेही पाठिंबा मागणार असल्याचे सांगितले. त्यातच भाजपकडून उमेदवारीची मागणी करणाऱ्या धनंजय जाधव यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे.
त्यामुळे भाजपकडून तांबे यांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता वाढली आहे. तांबे यांची भाजपशी जवळीक वाढत असल्याच्या वृत्तांमुळे नगर काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सत्यजित तांबे हे आमदार थोरात यांचे भाचे आहेत. नगर शहर काँग्रेस पक्षात सध्या थोरात व तांबे समर्थकच अधिक आहेत. या सर्व घडामोडींवर थोरात यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दोन दिवसांपूर्वी नगर काँग्रेसचे काही पदाधिकारी थोरात यांच्या भेटीला गेले होते. मात्र, थोरात यांच्याकडून कुठलेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. दुसरीकडे तांबे यांच्याकडून नगर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. त्यामुळे नगर काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार थोरात यांच्या कन्याही तांबे यांच्यासमवेत उपस्थित होत्या, असे सांगितले जाते. त्यामुळे थोरात यांच्या भूमिकेची काँग्रेस पदाधिकाऱ्यांना प्रतीक्षा आहे.
Web Title: Come to the office bearers of Congress. Waiting for Thorat’s role
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App