अहिल्यानगर: आठवीच्या विद्यार्थ्यावर वर्गमित्रांनी केला चाकू हल्ला
Breaking News | Ahilyanagar Crime: इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी चाकूने हल्ला केला आहे. शहरातील वीरसावरकर मैदानामध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली.
पाथर्डी: पाथर्डीमध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी चाकूने हल्ला केला आहे. शहरातील वीरसावरकर मैदानामध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत वेदांत दत्ताञय कुलट हा विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे. या संदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झालेला नव्हता. या घटनेने पालक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. वेदांत कुलट हा शहरातीलच एका विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. आज दुपारी तो विद्यालयातून घरी आला व एका कामासाठी तो दुचाकीवरून वीर सावरकर मैदानावर गेला. या वेळी तेथे त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थी आले व त्यांच्याशी झालेल्या किरकोळ वादातून या दोन मित्रांनी कुलट याच्या पाठीवर चाकूने वार केले. या घटनेत कुलट हा जखमी झाला. त्याला जवळच असलेल्या काही नागरिकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुंड व संजय जाधव यांनी भेट दिली असून या घटनेतील दोन विद्यार्थ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
Breaking News: Classmates attack 8th grade student with knife