अहिल्यानगर: अपार्टमेंटमध्ये सापडली साडेआठ लाखांची रोकड आणि नोटा मोजण्याची मशीन
Breaking News | Ahilyanagar: एका अपार्टमेंट मध्ये टाकलेल्या छाप्यात क्लब तर आढळला नाही, मात्र 8 लाख 50 हजारांची संशयित रोकड सापडली.
अहिल्यानगर: जुगाराचा क्लब सुरू असल्याच्या माहिती वरून शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांच्या पथकाने कोठी रस्त्यावर एका अपार्टमेंट मध्ये टाकलेल्या छाप्यात क्लब तर आढळला नाही, मात्र 8 लाख 50 हजारांची संशयित रोकड सापडली आहे. तसेच नोटा मोजण्याची मशीन आढळून आली.
शंकरभाई हरीभाई पटेल (वय 40 रा. कोठी रस्ता) यांच्या ताब्यात ही रक्कम आढळून आली आहे. पोलिसांनी ती ताब्यात घेवून पंचनामा करत जिल्हा कोषागारात जमा केली आहे. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या आणि दिवाळी सणाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक भारती हे मंगळवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात आलेले होते. त्याच वेळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, कोठी रोड वर हॉटेल सुखसागर जवळ असलेल्या एका अपार्टमेंट मध्ये जुगाराचा क्लब सुरू आहे.
ही माहिती मिळताच त्यांनी उपअधीक्षक भारती यांना सांगितली. त्यामुळे उपअधीक्षक भारती व पथकाने तात्काळ त्या अपार्टमेंटकडे धाव घेत छापा टाकला. त्यावेळी तेथे जुगार खेळताना कोणी आढळले नाही, मात्र एक नोटा मोजण्याची मशीन दिसून आली. त्यामुळे पथकाला संशय आला आणि त्यांनी तेथे झडती घेतली असता 8 लाख 50 हजारांची रोकड आढळून आली. त्या रोकडबाबत सदर इसमाला विचारपूस केली असता त्यास रोकड बाबत योग्य माहिती देता आली नाही. त्यामुळे पथकाने सदर रोकड जप्त करून पंचनामा केला असून याबाबत जिल्हा प्रशासन आणि आयकर विभागाला माहिती कळविली आहे.
Web Title: Cash of eight and a half lakhs was found in the apartment
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study