Home अकोले अकोले: अण्णा वैद्य हत्या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा; चौघे अटकेत

अकोले: अण्णा वैद्य हत्या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा; चौघे अटकेत

Akole News:  महिला हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी अण्णा वैद्य याच्या खून प्रकरणी यांच्यावर अकोले पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खुनाचा (Murder) गुन्हा दाखल.

Case against eight persons in Anna Vaidya murder case Four arrested

अकोले:  सुगाव महिला हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी अण्णा वैद्य याच्या खून प्रकरणी यांच्यावर अकोले पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मयत अण्णा वैद्य याचा मुलगा प्रशांत याने अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथील महिलांचे हत्याकांड संपूर्ण राज्यात गाजले होते. अण्णा वैद्य याचे शेताच्या परिसरात 2005 मध्ये पुरलेल्या महिलांचे सांगाडे सापडले होते. गावातील वीज पंप व केबल चोरी प्रकरणाचा तपास करत असताना त्याचे शेताच्या बांधावर एका महिलेचा सांगाडा सापडला. त्यामुळे खळबळ निर्माण झाली. नंतर पोलिसांनी केलेल्या तपासात शेताच्या परिसरात एकूण 4 सांगाडे आढळून आले.

अंगणवाडी सेविका व अण्णा वैद्यची बहीण-शशिकला गोर्डे (पानसरवाडी, अकोले), कमल कोल्हे, (धांदरफळ खुर्द, ता. संगमनेर), भाजीपाला विक्रेती छाया राऊत (माळीवाडा, संगमनेर) आणि विडी कामगार पुष्पा देशमुख (सुगाव बुद्रुक,ता.अकोले) या महिलांचे हे सांगाडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आमिष दाखवून अण्णा वैद्यने या महिलांचे खून केले, पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना शेतात पुरले, या आरोपावरून त्याचे विरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांनी गुन्ह्याचा शोध लावण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. या प्रकरणात अण्णा वैद्यची बंगळरू येथे नेऊन नार्को टेस्टही करण्यात आली होती. तालुक्यातील एखाद्या गुन्हेगाराची अशा प्रकारे नार्को टेस्ट करण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे या प्रकरणाची तेंव्हा चांगलीच चर्चा झाली होती.

अण्णा वैद्य वर दाखल झालेल्या गुन्हयापैकी दोन गुन्ह्यात त्याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयातील अपिलात ही शिक्षा रद्द करण्यात आली तर उर्वरित दोन गुन्हयात त्याची निर्दोष मुक्तता झाली.या सर्व प्रकरणात तो 13 वर्ष जेल मध्ये होता. जेल मधून सुटून आल्यापासून सुगाव खुर्द या गावी तो एकटाच राहत होता. काल रविवारी सायंकाळी त्याने एका अल्पवयीन मुलीची छेड काढली व तिला बेदम मारहाण केली. यात ती मुलगी जखमी झाली. या मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून अण्णा वैद्य विरुद्ध विविध कलमांनुसार अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे संतप्त झालेल्या काही जणांनी अण्णा वैद्यला घरातून बाहेर काढत बेदम मारहाण केली. या मारहाणीचे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपचारासाठी अण्णा वैद्यला अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले.उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

काल सोमवारी सकाळी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. दुपारी सुगाव खुर्द येथे पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान काल सायंकाळी त्याचा मुलगा प्रशांत याने अकोले पोलीस ठाण्यात या घटने संदर्भात फिर्याद दाखल केली. 10 डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास माझे वडिलांनी एका मुलीस मारहाण केल्याचा राग मनात धरून गैरकायद्याची मंडळी जमवून व आपसात संगनमत करून रवींद्र सूर्यभान सोनवणे, बापू दिलीप अभंग, सुनिता रवींद्र सोनवणे, सोमनाथ गभाजी मोरे, सविता गणेश वाकचौरे, सागर मंगेश दिवे, स्वाती सागर दिवे तसेच दत्ता शिवराम सोनवणे सर्व रा.सुगाव खुर्द,ता अकोले यांनी माझे वडील राहत असलेल्या घरात घुसून त्यांना जाब विचारत लाठी काठ्यांनी व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून घरातील सामानाची नासधूस केली.तसेच माझे वडिलांना घरातून मारहाण करत मुख्य रस्त्यावरील चिंचेच्या झाडाखाली आणून काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी त्याठिकाणी आलेला दत्ता शिवराम सोनवणे याने सुद्धा माझे वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वरील सर्वांनी माझे वडिलांना लाठी काठीने व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून जीवे ठार मारले. या आशयाच्या फिर्यादीवरून या सर्वांविरुद्ध खुनाचा तसेच विविध कलमांनव्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे व उप निरीक्षक भूषण हांडोरे हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Case against eight persons in Anna Vaidya murder case Four arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here