संगमनेरात कॅफे हाऊसवर छापा, 12 विद्यार्थी-विद्यार्थिनी , चालकावर गुन्हा
Sangamner News: एका कॅफे हाऊसवर शहर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात युवक युवतींच्या सहा जोड्या आढळून आल्या.
संगमनेर: शहरातील अकोले बायपास नजीकच्या राहणे मळ्यातील असणाऱ्या एका कॅफे हाऊसवर शहर पोलिसांनी काल गुरूवारी (दि. २८) छापा टाकला. या छाप्यात युवक युवतींच्या सहा जोड्या आढळून आल्या आहेत. यावेळी पोलिसांनी कॅफे हाऊसमधून १२ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व कॅफे चालकास ताब्यात घेतले. यामध्ये सहा मुली आणि सहा मुलांचा समावेश आहे. या कॅफेत सोयीस्कर छुपे कप्पे बनविल्याचे आढळून आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कॅफे चालक अभय चंद्रकांत गवळी वय १९ रा. कासारवाडी याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की संगमनेर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे कॅफे हाऊस सुरू आहेत. या कॅफे हाऊसमध्ये अनैतिक प्रकार सुरू आहेत.
काही महिन्यांपूर्वी एका कॅफे हाऊसवर कारवाई करण्यात आली होती. शहरातील अकोले बायपासलगत असणाऱ्या कॅफे हाऊसमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांनी मिळताच त्यांनी या कॅफे हाऊसवर छापा टाकला.
या ठिकाणी पोलीस पथकाला सहा मुले, सहा मुली आढळून आल्या. सदर कॅफेमध्ये कोणतेही साहित्य व कॅफेचा बोर्ड पोलीस पथकाला आढळून आला नाही. तरुण-तरुणींना एकांत मिळावा या उद्देशाने स्वतंत्र कप्पे बनवून देण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कॅफ हाऊसमध्ये आढळलेल्या मुला-मुलींसह कॅफेचालकाला ताब्यात घेतले. संबंधितावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काही दिवसांपूर्वी शहरातील विविध कॅफेंवर एकाचवेळी छापा टाकून २०हून अधिक मुला-मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच कॅफेमध्ये काही मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी काही दिवसांपूर्वी या बेकायदा कॅफे चालकांविरोधात धडक कारवाई केली होती. या कारवाईनंतर काल गुरूवारी पुन्हा पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कॅफे हाऊसवर कारवाई केली आहे.
दरम्यान अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याच्या कारणावरून कॅफे हाऊस चालक अभय चंद्रकांत गवळी याच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरालगतच्या अकोले बायपास परिसरातील राहणेमळा येथील रिलॅक्स कॅफे हाऊसमध्ये शहर पोलिसांनी काल गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छापा टाकला होता. पोलिसांना रिलॅक्स कॅफेमध्ये तरुण मुली-मुलांना अश्लील हावभाव अथवा कृत्य करण्यास सुलभ व्हावे,
त्या बदल्यात त्यांच्याकडून तासाप्रमाणे पैसे घेऊन यासाठी जागा उपलब्ध करून देताना गवळी आढळून आला होता. कॅफेमध्ये मुला-मुलींच्या जोड्या आढळून आल्या होत्या. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास शिरसाठ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून कॅफे चालक गवळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Cafe house raided in Sangamner 12 students detained, driver booked
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App