सी एल. राहणे सर आदर्श शिक्षक, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक होणे नाही! कोटी कोटी प्रणाम…..
C L Rahane Sir is not about being an ideal Teacher: संस्कारी आदर्श कुटुंब प्रमुख, शिस्तप्रिय नेतृत्व, विद्यार्थी प्रिय शिक्षक, आदर्श शिक्षक ,आदर्श गुरू, आदर्श वडील, कुशल प्रशासक, संघटक, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक होणे नाही अशा महान दादांना माझा कोटी कोटी प्रणाम…..

चंदनापुरी: 1950 च्या दशकात खडतर जीवन जगत असताना लहानु व सजाबाई( आजी आजोबा) यांच्या पोटी आठ बहीण भाऊ जन्मले त्यातले सर्वात ज्येष्ठ मुलगा छबुराव लहानू राहणे म्हणजेच (दादा), भाऊसाहेब, रावसाहेब, राजाराम व आत्या हिराबाई, मीराबाई, झुंबरबाई, मंदाबाई यांतील दादांचा जन्म 11 डिसेंबर 1957 रोजी रात्रीच्या वेळी मामाच्या गावी सुदाम पानसरे यांच्या घरी निमज, ता. संगमनेर येथे झाला. राहाणे घराण्यामध्ये चैतन्याचे वातावरण फुलले, त्याकाळी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून फक्त शेतीच केली जायची परंतु त्या शेतीतून फार असे उत्पादन मिळत नसे म्हणून दादांच्या वडिलांनी विडी कामगार म्हणून विड्या बांधून कुटुंबाचे पालन पोषण केले.
दादांचे शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शिक्षण चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी येथे झाले.शिकण्याची जिद्द व चिकाटी असल्याने एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन बोर्डावर नाव कोरले. तेव्हा उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पुरस्कृत करण्यात आले. तसेच पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी संगमनेर गाठले, शिक्षण पूर्ण करत असताना अनेक हाल अपेष्ठांना सामोरे जात असताना कधी -कधी शिळ्या भाकरी सोबत लसणाची चटणी खाऊन , कधी उपाशी पोटी राहून, कधी रूम मालकाचा ओरडा खाऊन दिवस काढले व आपले बीए. बीएड. शिक्षण जिद्दीने व चिकाटीने पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी शोधत असताना आपल्याच गावातील जनता शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमध्ये प्रथम मुलाखत दिली असता तेथे मुलाखतीसाठी उपस्थित असलेले कमिटी मेंबर पैकी कॉम्रेड पर्बत मनाजी राहाणे (नाना) यांनी दादांच्या चौकस बुद्धिमत्तेची, हुशारीची, प्रामाणिकपणाची, पारख करून त्यांची निवड केली व 1981 साली चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी येथे विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षक म्हणून रुजू झाले.
घरी शेतामध्ये पेरूचा बाग होता त्या बागातील पेरू विकण्यासाठी गावातील मारुती मंदिर येथे बाजारपेठ होती तेथेच बाबांची भेट कारभारी नेहे यांच्याशी झाली व त्याचे मैत्रीत रूपांतर होऊन कारभारी व चहाबाई यांची मुलगी पद्मावती म्हणजेच माझी आई हिच्याशी विवाह बंधनात दादा अडकले व काटकसरीने प्रपंच सुरू झाला. पुढे काही वर्षांमध्ये त्यांना विजय ,मेघा ,विकास ही तीन अपत्य झाली.
सर्वकाही सुखरूप चालू असताना अचानक बाबांना गंभीर आजार जडला व त्यातच त्यांचे 1993 साली अकाली दुःखद निधन झाले या कारणाने अतिशय कमी वयामध्ये दुहेरी कौटुंबिक जबाबदारी दादांच्या खांद्यावर पडली, त्यामध्ये एकीकडे भावंडांचे शिक्षण तसेच बहिणीचे विवाह कार्य दादांनी यशस्वीरित्या पार पाडली, हे सर्व करत असताना दादांच्या जीवनात पर्बत नाना, जगन्नाथ गुरुजी ,मारुती शंकर रहाणे, जी. डी. राहाणे ,आनंदराव कढणे ,बाळकृष्ण गडाख , पर्वत रमाजी राहाणे ,लहानु भाऊ फापाळे ,व्ही. बी. कढणे , कॉ. शिवनाथ जाधव यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. व पुढे या महान व्यक्तींचे विचार त्यांच्या मनावरती प्रभाव करून गेले आणि पुढे ते कॉम्रेड सेनानी झाले आणि लालबावट्यासोबत काम करू लागले.
दादांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन कौशल्य व कठोर परिश्रमाने नव्याने सुरू झालेल्या विद्यालयाच्या समस्यांवर मात करून संगमनेर तालुक्यातील एक उपक्रमशील व उत्कृष्ट विद्यालय म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी मोलाचा वाटा होता. अध्यापनाचे काम करत असताना इतिहास व भूगोल हा विषय उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडण्याची एक वेगळीच शैली दादांकडे होती त्याचबरोबर शारीरिक शिक्षण व स्काऊट गाईड (एम.सी.सी) हे दादांचे आवडीचे विषय होते. त्यासाठी दादा विद्यार्थ्यांना खेळात विरोधी स्पर्धकाला कसे चितपट करायचे याचे धडे वेळोवेळी देऊन तालुका पातळी, जिल्हा पातळीवर होणाऱ्या क्रीडा स्पर्धा विशेषतः खो-खो, कबड्डी स्पर्धांमध्ये विद्यालयास प्रथम क्रमांक मिळवून देण्यास विशेष कामगिरी केली. हे सर्व करत असताना त्यांचे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी ताऱ्याप्रमाणे विविध क्षेत्रात झळकले. त्याचप्रमाणे विज्ञानाची प्रचंड वेगाने होणारी प्रगती व जीवन मूल्यांची घसरण, प्रामाणिकपणा, शिस्त, अर्थव्यवस्था, या गोष्टींचे भान ठेवून आपणास आजच्या परिस्थितीला सामोरे जावयाचे आहे. शिक्षण ही बाब राजकारणाविरहित ठेवूनच काम केले तरच यश मिळते असे धडे आपल्या सहकारी मित्रांना व विद्यार्थ्यांना देत असे. दादा नेहमी सर्वांना एक समान न्याय कसा देता येईल या विचारात असत.
दादा शाळेमध्ये सेवा देत असतानाच अशिक्षितांना सुशिक्षित करण्यासाठी रात्र शाळा चालवत असे यामध्ये त्यांनी आपल्या सहकारी शिक्षकांची मदत घेऊन सुशिक्षित समाज घडविण्यासाठी दादांनी मोलाचे योगदान दिले. शैक्षणिक कार्या सोबतच सामाजिक बांधिलकी साठी दादांचे फार मोलाचे योगदान होते. त्यामध्ये विडी कामगारांच्या मुलांच्या भवितव्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून पैसे कसे बचत करायचे व त्याचा योग्य ठिकाणी वापर कसा करायचा यांचे सतत मार्गदर्शन देत असत.
जनसेवेसाठी श्रमतांना पाय कधीच थकले नाही।
प्रश्नांना भिडतांना समस्या सोडवितांना उमेद कधीच खचली नाही ।।
साभांळून प्रत्येकाला सन्मान सर्वांचा राखतांना उणेपणा कधी मानला नाही ।।
झाले ते इवलेसे राहिले अजून खूप काही।
याचा विसर कधीही पडणार नाही ।।
कॉ. पर्बत मनाजी राहणे (नाना) ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चंदनापुरीचे विद्यमान संचालक म्हणून आज तागात पर्यंत काम पाहत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चंदनापुरी संस्थेचे चेअरमन म्हणून काही वर्षे काम पाहिले. तसेच चंदनापुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक म्हणून काही वर्षे कार्यभार सांभाळला. गावातील इतर मित्रांच्या काही समस्या असतील त्याही सोडवण्यासाठी त्यांना सतत मार्गदर्शन करत राहिले . संगमनेर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून हिरालाल पगडालाल सरांसोबत काही वर्ष काम केले व संघटना मजबूत केली आणि विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानित करण्यासाठी लढा दिला आणि तो यशस्वीरित्या पार पाडला .हे कार्य करत असताना पुढे तिन्ही भावांची विवाह चांगल्या कुटुंबातील मुलींशी शारदा, प्रिया (सखुबाई) व शिला यांच्याशी करून दिली. तसेच मुलांना उच्च शिक्षण देऊन विजय हा (एम लिब, एम फिल, पीएचडी) नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी चे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे तसेच विकास ने (एम एस सी ,नर्सिंग) करून तो सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय सेवेत कार्यरत आहे व मुलगी मेघा ( बी.लिब, एम लिब)पूर्ण करून स्टर्लिंग स्कूल भोसरी येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे. तसेच पुढे मुलांच्या लग्नाची ही जबाबदारी दादांनी पार पाडत असताना सुशिक्षित घरातील सुनबाई मुलांना करून आणल्या त्यात मोठी सून अलका ही (एम. ए., एम फील) व धाकटी सून कल्पना (एम. बी. ए., एच आर) आहे. नोकरी सोबतच शेती व्यवसाय करत असताना शेतीचाही विकास करण्यास सुरुवात केली त्यात शेती वाढवली व विकसित केली पाणीटंचाई दुष्काळ असल्यामुळे प्रवरा नदीवरून शेअर्स स्वरूपात नदीच्या पाण्याची पाईपलाईन केली तसेच ते पाणी साठवण्यासाठी शेततळे देखील बांधले व तेथे शेतीचे अवजारे खते बी बियाणे ठेवण्यासाठी छोटेसे घर देखील बांधले. पारंपारिक शेती करत असताना बैलांचा चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होत होता त्यामुळे ट्रॅक्टरच्या साह्याने आधुनिक शेती व्यवसाय करू लागले तो ही अगदी प्रामाणिकपणे म्हणजेच कोणत्या वेळी कोणते पीक घेतले पाहिजे व त्याला कोणते खत व औषधे फवारले पाहिजे हे ते सतत आपल्या भावंडांना व नातेवाईकांना मार्गदर्शन करत असत. कृषी शास्त्राचा देखील खूप अभ्यास दादांचा झालेला होता. सर्व कुटुंब एकत्रित ठेवण्यासाठी दादांनी खूप त्याग व संघर्ष केला. दादांनी स्वतःची तत्त्व जपताना त्यांनी कधीच भावंडे व स्वतःची मुले यामध्ये दुजाभाव केला नाही. दादा कठोर व शिस्तप्रिय स्वभावाचे होते परंतु त्यामध्ये त्यांचा उद्देश हा वेगळाच प्रेरणा देणारा व व्यक्ती घडविणारा होता. घराची सर्व जबाबदारी पार पाडताना कधी मोठ मोठी संकटे आली असतील तरी देखील ते डगमगले नाही व सर्व संकटांना सामोरे जाऊन त्यावर मात केली परंतु त्यांनी आम्हाला कधी जाणीव देखील होऊ दिली नाही. मध्यंतरीच्या काळात आईचे छत्र हरविले परंतु त्याची उणीव देखील आपल्या भावंडांना भासू दिली नाही. पुढे पुतण्यांचे चांगले शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले त्यामध्ये धनंजय याला तंत्रनिकेतन अभियंता ओंकार व ऋषिकेश याला अभियांत्रिकी अभियंता व साहिल यास फार्मसीचे शिक्षण घेण्याचा एक वेगळाच सल्ला दिला व त्यात ते यशस्वी देखील झाले तसेच पुतणी सोनाली हिला देखील अभियांत्रिकीचे शिक्षण देऊन चांगल्या कुटुंबातील मुलाशी विवाहित करून दिला व दुसरी पुतणी मंगल हिला संगणकीय अभियांत्रिकीचे शिक्षण देऊन चांगल्या कंपनीत नोकरी करण्याचा सल्ला दिला.
हे सर्व करत असतानाच दादांची अध्यापन सेवेतून निवृत्ती झाली. शालेय कामकाज करत असताना चंदणेश्वर विद्यालय चंदनापुरी येथे जास्त सेवा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर देवगड विद्यालय हिवरगाव पावसा येथे देखील पर्यवेक्षक म्हणून काही वर्ष सेवा दिली. पुढे बढती मिळून निझणेंश्वर विद्यालय कोकणगाव येथे मुख्याध्यापक म्हणून 31 डिसेंबर 2015 रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना बीपी आणि शुगर या मोठया आजारांनी अधिक ग्रासले. औषधोपचार चालू असताना देखील प्रकृती स्वास्थ्य लाभले नाही त्यातच मणक्याच्या आजाराने ही डोके वर काढले. नातवंडांसोबत दिवस घालवण्याऐवजी जास्त वेळ वैद्यकीय उपचारांमध्येच गेला तरी देखील ते आजाराला डगमगले नाही त्यांनी आपली नातवंडे तनुष्का, श्रेया, अवनिश, शिवण्या आणि शंतनू यांना उच्चशिक्षित बनवा असा सल्ला आम्हाला दिला. दादांचे प्रेम सर्व कुटुंबांसोबत सर्व नातेवाईकांमध्ये श्रेष्ठ स्थानी असल्यामुळे सर्वांना सामावून घेत आपुलकीचा सल्ला नेहमी देत असत त्यामुळे दादांसोबत उभे राहण्यासाठी नातेवाईकांचा नेहमी पाठिंबा राहिला आणि दादांनीही कधी मोठा- छोटा, आपला- परका असा भेदभाव केला नाही. त्यांच्या हातूनच त्यांच्या भाच्यांचे देखील विवाह पार पडले व सर्वांना गुण्यागोविंदाने संसार करा असा सल्ला देत राहिले. शेवटच्या काळात त्यांना आजाराने खूपच त्रासले वैद्यकीय उपचार घेण्यासाठी नाशिक, पुणे ,मुंबई छत्रपती संभाजीनगर संगमनेर या ठिकाणी देखील जावे लागले परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही आणि पुढे डॉक्टरांनी त्यांना बेडरेस्ट सांगितली या काळात आक्का (आई पद्मावतीने) दादांची खूप काळजी घेतली तसेच कुटुंबातील सर्वजणांनी दादांची सेवा केली परंतु ती देखील भगवंताला मान्य नव्हती भगवंताने दादांना आमच्यापासून हिरावून घेतले..
स्वच्छ पोशाखा बरोबरच
दादांचे मन असे प्रसन्न जसे देवांचे अंगण..
बोलणे असे शितल जसे शरदाचं चांदणं…
व्यक्तिमत्व असे बुलंद जसा तुकड्यांचा अभंग!
कर्तुत्व असे जसा दरवळे चंदन चारित्र्य असे निर्मळ जसा राजहंस धवल!!
असा संस्कारी आदर्श कुटुंब प्रमुख, शिस्तप्रिय नेतृत्व, विद्यार्थी प्रिय शिक्षक, आदर्श शिक्षक ,आदर्श गुरू, आदर्श वडील, कुशल प्रशासक, संघटक, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक होणे नाही अशा महान दादांना माझा कोटी कोटी प्रणाम…..
Breaking News: C L Rahane Sir is not about being an ideal teacher
















































