Home जालना बस जाळली! प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; पुढील सूचना मिळेपर्यंत..

बस जाळली! प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; पुढील सूचना मिळेपर्यंत..

Maratha Reservation: राज्य परिवहन महामंडळाची बस पेटवून देण्यात आली.

bus burned The administration took a big decision

Maratha Reservation: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर रविवारी दुपारी मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा सामाजाचे आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचे पडसाद घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीमध्ये उमटले असून मराठा आंदोलकांनी या अटकेला विरोध करत एक एसटी बस जाळली आहे. या जाळपोळीनंतर पुढील सूचना मिळेपर्यंत एसटीची सेवा जालना जिल्ह्यामध्ये स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

अंतरवाली सराटी येथे रविवारी समाजातील सदस्यांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांना माझा बळी हवा आहे असं म्हणत आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं. तसेच संतापलेल्या जरांगे-पाटलांनी थेट मुंबईमधील फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर आपण जाणार असल्याचं म्हटलं. भाषण संपता संपता अस्वस्थ झालेले जरांगे पाटील आंदोलनाच्या ठिकाणावरुन उठून चालू लागले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न अनेक सहकाऱ्यांनी केला मात्र जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम असून त्यांनी आपला प्रवास सुरुच ठेवला. रविवारी रात्रीचा मुक्काम जरांगे-पाटील यांनी भांबेरी गावात केला. जरांगेंबरोबर मोठ्या संख्येनं मराठा समाजातील सदस्य आहेत. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास जरांगे पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. दरम्यान, या साऱ्या गोंधळामध्ये पोलिसांनी मनोज जरांगे-पाटलांच्या 2 सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

मुक्कामी असलेल्या भांबेरी गावामधून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तयारी करत असलेल्या मनोज जरांगे-पाटलांच्या 2 सहकाऱ्यांना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे अशी आहेत. हे दोघेही मराठा आंदोलनामध्ये सक्रीयपणे सहभागी असून मनोज जरांगे-पाटलांबरोबर निघालेल्या मराठा आंदोलकांमध्येच या दोघांचा समावेश आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी रात्रीपासूनच भांबेरी गावामध्ये मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी तेथे राज्य परिवहन महामंडळाची बस पेटवून देण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी बस पेटवल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे-पाटलांबरोबचे मराठा आंदोलक शैलेंद्र पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यातूनच त्यांनी ही बस जाळल्याचं सांगितलं जात आहे.

प्रशासनाने भांबेरी गावाबरोबरच संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. जालन्यातील अंबडमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या हजारो मराठा आंदोलक जरांगे-पाटील मुक्कामी राहिलेल्या भांबेरी गावामध्ये आहेत. सकाळी 10.30 ते 11 दरम्यान जरांगे आपल्या समर्थकांबरोबर मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरु करतील अशी माहिती देण्यात आलेली आहे.

Web Title: bus burned The administration took a big decision

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here