Home महाराष्ट्र हातावर मेहंदी आणि अंगावर हळद लागलेल्या नववधूची लग्नाच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या

हातावर मेहंदी आणि अंगावर हळद लागलेल्या नववधूची लग्नाच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या

Solapur News:  नियोजित नवरदेवाकडे खोटी अश्लिल छायाचित्रे पाठवून लग्न मोडण्यास भाग पाडल्याने वैफल्यग्रस्त होऊन नववधूने लग्नाच्या दिवशीच पहाटे गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.

Bride commits suicide by hanging herself on the day of marriage

सोलापूर : सरळ स्वभावाचा गैरफायदा घेऊन एका तरुणीला ब्लॅकमेलिंग करून तिचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी तिच्या नियोजित नवरदेवाकडे खोटी अश्लिल छायाचित्रे पाठवून लग्न मोडण्यास भाग पाडल्याने वैफल्यग्रस्त होऊन नववधूने लग्नाच्या दिवशीच पहाटे गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. हातावर मेहंदी आणि अंगावर हळद लागलेल्या नववधूने टोकाचं पाउल उचलल्याने परिसर हादरला आहे.

याप्रकरणी संबंधित तिघा तरुणांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दुर्दैवी मृत तरुणीने तीन दिवसांपूर्वीच पोलिसांकडे केली होती. परंतु कारवाई झाली नाही आणि इकडे त्या तरुणांचा त्रास वाढला आणि लग्नही मोडल्यामुळे नववधूने टोकाचे पाऊल उचलत आहे. कुमठे गावातील ओम नमःशिवाय नगरात पहाटे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कुमठे परिसर हादरला आहे.

सालिया महिबूब शेख (वय २५) असे आत्महत्या केलेल्या नववधूचे नाव आहे. या घटनेने शेख कुटुंबीय व नातेवाईकांना प्रचंड धक्का बसला आहे. संबंधित तिघा तरुणांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत नववधू मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा उद्विग्न झालेल्या शेख कुटुंबीयांनी घेतला होता.

मृत सालिया हिचे वडील महिबूब शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सालिया हिने चांगला अभ्यास करून डी. फार्मसीची पदविका घेतली होती. सरळ आणि मोकळ्या स्वभावाची, रूपवान असलेल्या सालिया हिला गावातील समीर चाँदसाहेब शेख, सलमान पीरसाहेब शेख आणि वसीम शेख हे तिघे तरुण सतत त्रास द्यायचे. तिचे लग्न जुळल्यानंतर लग्न करू नको, आम्ही हे लग्न होऊ देणार नाही, तुझी बदनामी करू, अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग करायचे. तिचे लग्न आज सोमवारी, १८ डिसेंबर रोजी ठरले होते. परंतु संबंधित तिघा तरुणांकडून त्रास देणे थांबत नसल्यामुळे त्यांच्या विरुद्ध सालिया व तिच्या वडिलांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. परंतु पोलिसांनी हे प्रकरण वेळीच गांभीर्याने घेतले नाही. दुसरीकडे संबंधित तिघा तरुणांनी सालिया हिचे छायाचित्र मार्फिंग करून खोट्या अश्लील स्वरुपात तिच्या नवरदेवाकडे पाठविले. तेव्हा नवरदेवाने हळदकार्यानंतर अधिक चौकशी न करता तत्काळ लग्न मोडीत काढले. तसा निर्णय सालिया हिच्या पालकांना कळविला. तेव्हा सालिया हिला आपली झालेली बदनामी, कुटुंबीयांची बेइज्जती आणि मोडलेले लग्न यामुळे प्रचंड नैराश्य आले. त्यातूनच तिने घरातील एका खोलीत छतावरील विद्युत पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेत जीवन संपविले.

Web Title: Bride commits suicide by hanging herself on the day of marriage

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here