अहिल्यानगर: ५० हजारांची लाच; प्रभारी तलाठी जाळ्यात
Breaking News | Ahilyanagar Bribe Case: घरकुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रातून वाळू आणल्याने कारवाई टाळण्यासाठी खासगी व्यक्तीमार्फत तलाठ्याने ५० हजारांची लाच स्वीकारल्याचे समोर. ३१ जुलै रोजी मिरी गावातील एक मंदिर परिसरात सापळा रचला होता.
पाथर्डी | तिसगाव: घरकुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रातून वाळू आणल्याने कारवाई टाळण्यासाठी खासगी व्यक्तीमार्फत तलाठ्याने ५० हजारांची लाच स्वीकारल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी सतीश रखमाजी धरम (४०, रा. मिरी, ता. पाथर्डी) व त्यांचा खासगी सहकारी अक्षय सुभाष घोरपडे (२७, रा. शिंगवे केशव, ता. पाथर्डी) यांना रंगेहाथ पकडले.
तिसगाव (ता. पाथर्डी) शहराजवळील पारेवाडी येथील तक्रारदाराच्या वडिलांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलाचे काम सुरू केले होते. त्यासाठी नदीपात्रातून मुरूम व वाळू आणली होती. बुधवारी (दि. ३०) रात्री आडगावचे तलाठी (तिसगावचे प्रभारी) सतीश धरम व महसूल पथकाने हा मुरूम व वाहने पाहून त्यावर कारवाई करण्याची धमकी दिली. कारवाई नको असल्यास एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ५० हजार रुपये लाच देण्याचे ठरले. दरम्यान, याबाबत अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तक्रारदाराने संपर्क साधला. त्यानुसार, पोलिस उपअधीक्षक त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जुलै रोजी मिरी गावातील वीरभद्र मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला.
त्यावेळी तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच तलाठी धरम यांनी स्वीकारून ती खासगी सहकारी अक्षय घोरपडे याच्याकडे सुपूर्द केल्यावर पथकाने दोघांनाही अटक केली. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात सध्या राज्य शासनामार्फत महसूल सप्ताह राबवण्यात येत असून, या काळातच महसूल विभागातील तलाठ्याने लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Breaking News: Bribe of Rs 50 thousand; Talathi in charge caught