वाळूची कारवाई न करण्यासाठी घेतली 15 हजारांची लाच, तहसीलचे दोन कर्मचारी जेरबंद
Ahilyanagar Bribe Case: वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर कारवाई करू नये म्हणून लाचेची मागणी.
कोपरगाव: वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर कारवाई करू नये म्हणून लाचेची मागणी करणार्या कोपरगाव तहसील कार्यालयाचा लिपिक चंद्रकांत नानासाहेब चांडे व योगेश दत्तात्रय पालवे यांच्याकडून 15 हजारांची लाच स्वीकारताना प्रतीक कोळपे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदार याचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून तो व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी आरोपी चंद्रकांत नानासाहेब चांडे (वय 39 वर्षे) लिपीक वर्ग-3, तहसील कार्यालय, कोपरगाव) रा. कला साई, बंगला सम्यक नगर, कोपरगाव व आरोपी योगेश दत्तात्रय पालवे (वय-45) अव्वल कारकून वर्ग-3,तहसील कार्यालय, कोपरगाव यांनी आरोपी खासगी इसम प्रतीक कोळपे यांचे मार्फत तक्रारदार यास दरमहा 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार केली होती. त्यावरून दि. 6 डिसेंबर रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आरोपी चंद्रकांत चांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 15 हजार रुपये लाचेची मागणी केली व मागणी केलेली लाचेची रक्कम खासगी आरोपी इसम प्रतीक कोळपे याचेकडे देण्यास सांगितले.
त्यामुळे तक्रारदार यांनी खासगी इसम प्रतीक कोळपे यास संपर्क केला असता त्याने आरोपी चांडे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर आरोपी पालवे व आरोपी चांडे यांना फोनद्वारे आरोपी खासगी इसम प्रतीक कोळपे यांनी 15 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारलेबाबत सांगितले असता आरोपी चंद्रकांत चांडे व आरोपी योगेश पालवे यांनी खासगी इसम प्रतीक कोळपे यास सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली.
याबाबत वरील तीनही आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7 अ व 12 अन्वये गुन्हा नोंद करण्याची करण्यात आला आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संतोष पोलीस उपधीक्षक रवींद्र पैलकर, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस हवालदार दिनेश खैरनार, गणेश निंबाळकर,पोलीस नाईक अविनाश पवार,पोलीस शिपाई नितीन नेटारे आदींनी केली आहे.
Web Title: bribe of 15 thousand was taken for not taking action on sand
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study