Breaking News | Ahmednagar: एका अनोळखी तरुणाचा (वय अंदाजे 35) मृतदेह आढळून आला आहे. सदर तरूणाचा घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
अहिल्यानगर: निंबळक चौक ते कल्याण बायपास रस्त्यादरम्यान निंबळक शिवारात एका अनोळखी तरुणाचा (वय अंदाजे 35) मृतदेह आढळून आला आहे. सदर तरूणाचा घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.
सोमवारी (14 एप्रिल) दुपारी निंबळक शिवारात रस्त्याच्या कडेला एक वाटसरू लघुशंकेसाठी थांबल्यानंतर त्याला एक मृतदेह दिसला. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. सुरूवातीला तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र सदरचा मृतदेह एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत असल्याने काही वेळाने एमआयडीसी पोलिसही घटनास्थळी आले. मृतदेह सात ते आठ दिवसापूर्वीच घटनास्थळी टाकला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. शरीरावर किरकोळ जखमा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी रूग्णवाहिकेतून मृतदेह येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविला.
पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे. सदर अनोळखी तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आले. दरम्यान, खून करून मृतदेह बायपास रस्त्यावर आणून टाकले जात असल्याचे प्रकार घडत आहे. मागील माहिन्यात अहिल्यानगर शहरातील उद्योजक दीपक परदेशी यांचा देखील खून करून मृतदेह निंबळक बायपास शिवारात आणून टाकला होता. आताही याच परिसरात मृतदेह आढळून आला आहे.
Web Title: body of the young man was found