अहिल्यानगर जिल्ह्यात वन विभागाच्या शिवारात तरुणाचा मृतदेह
Breaking News | Ahilyanagar: गाजदीपूरच्या वन विभागाच्या शिवारात २५ ते ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह.
पारनेर : पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील गाजदीपूरच्या वन विभागाच्या शिवारात २५ ते ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह २२ मे रोजी दुपारी ४ वाजता आढळला आहे.
याबाबतची खबर पारनेर पोलिसांना टाकळी ढोकेश्वर वनपरिक्षेत्राचे वनरक्षक विजय नागनाथ ननवरे यांनी दिली. गट नंबर १४१ मधील काटेरी झुडपात हा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे या तरुणाची ओळख
पटविण्याचे काम चालू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अभय दंडगव्हाण यांनी दिली. या तरुणाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात केली. त्यानंतर शासकीय सोपस्कार पूर्ण करत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यामुळे पीएम अहवाल आल्यानंतरच यासंबंधी अधिक माहिती समजू शकणार आहे.
या तरुणाच्या डोक्यावर जखम असून, त्याचा खून करण्यात आला आहे की अन्य काही प्रकार आहे, यादृष्टीने पारनेर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या तरुणाच्या डाव्या हाताच्या दंडावर धातूचे कडे व अंगात काळ्या रंगाचा लाल काठ असलेला बनियान घातलेला आहे. तसेच काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली असून आकाशी रंगाची अंडरवेअर घातलेली आहे. तरी याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास पारनेर पोलिस ठाणे, पोलिस निरीक्षक समीर बारवकर, अभय दंडगव्हाण यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.
Breaking News: Body of a young man found in the forest department