अहिल्यानगर: दुचाकीस्वराच्या गळ्याला केबल अडकल्याने मृत्यू, महामार्गावरील केबलने केला घात
Breaking News | Ahilyanagar Accident: महामार्गावर तुटलेली केबल न दिसल्याने ती दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकली, त्यामुळे दुचाकी घसरून तो खाली पडला. त्याचे डोके पथदिव्याच्या लोखंडी खांबाला आदळल्याने गंभीर जखमी, उपचार सुरु असताना झाला मृत्यू. (Dies)
अहिल्यानगरमध्ये नगर-मनमाड महामार्गावर सावेडी परिसरातील कीर्ती हॉटेलसमोर एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. महामार्गावर तुटलेली केबल न दिसल्याने ती दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकली, त्यामुळे दुचाकी घसरून तो खाली पडला. त्याचे डोके पथदिव्याच्या लोखंडी खांबाला आदळल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. मयत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर अंबादास बांगर (वय २७, रा. कारखेल, ता. आष्टी, जि. बीड) असून, तो एमआयडीसीमधील एका कंपनीत कामाला होता.
बांगर व त्याचा मावसभाऊ शुभम बाबासाहेब घुले (वय १८, रा. कारखेल, ता. आष्टी, जि. बीड) हे दोघे दुचाकीवरून नगरमध्ये आले होते. शुभम याला दुचाकीची सर्व्हिसिंग करायची असल्याने सावेडीतील साईदीप शोरूम येथे त्याला सोडून ज्ञानेश्वर हा दुपारी १ वाजता एमआयडीसी येथील एक्साईड कंपनीत कामाला निघून गेला होता. त्यानंतर रात्री ११ वाजता ज्ञानेश्वर कामावरून सुटल्यावर दोघेही कंपनीतून दुचाकीवर गावाकडे जाण्यासाठी निघाले. दुचाकी ज्ञानेश्वर चालवत होता. शुभम पाठीमागे बसलेला होता. मनमाड रोडने नगरकडे येत असताना सावेडी परिसरातील कीर्ती हॉटेलजवळ रस्त्याच्या वरून जाणारी काळी केबल तुटून खाली लोंबकळत होती.
अंधारामुळे त्यांना ती दिसली नाही, ही केबल ज्ञानेश्वर याच्या गळ्यात अडल्याने त्याची दुचाकी घसरून दोघेही खाली पडले. त्यावेळी ज्ञानेश्वरचे डोके दुभाजकात असलेल्या पथदिव्याच्या लोखंडी खांबाला आदळल्याने तो गंभीर जखमी झाला, तर शुभमही जखमी झाला. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी या दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मात्र, ज्ञानेश्वरची प्रकृती चिंताजनक असल्याने नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरू असताना १५ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत १८ जुलै रोजी दुपारी शुभम घुले याने तोफखाना पोलिस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
Breaking News: Biker dies after cable gets stuck in his neck