अकोलेत मोठी कारवाई! एक कोटी रुपयांचा गुटखा पकडला
Breaking News Akole Raid: गुटखा तस्करांवर छापेमारी करुन 1 कोटी 1 लाख 74 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत बारा जणांना ताब्यात घेतले.
Akole: पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पोलीस पथकाने रविवारी (दि.13) कोतूळ (ता.अकोले) येथील गुटखा तस्करांवर छापेमारी करुन 1 कोटी 1 लाख 74 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत बारा जणांना ताब्यात घेतले आहे. यामुळे अवैध धंदे चालकांत एकच खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष पोलीस पथकाची स्थापना केली आहे. या पथकाचे प्रमुख परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी धडक कारवायांचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. कोतूळ येथे केळी रस्त्याच्या कडेला शेडमध्ये अवैधरित्या गुटखा साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने रविवारी छापेमारी करुन भागीदारीमध्ये गुटख्याची साठवणूक करुन विक्री करणारे शोएब शाविद काजी व शाहिद हुसेन लतीफ पटेल या दोघांना ताब्यात घेतले.
या कारवाईत त्यांच्यासह इतर दहा जणांनाही ताब्यात घेतले असून, गुटखा (Gutkha), वाहने आणि रोख रक्कम असा एकूण 1 कोटी 1 लाख 74 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अकोले पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या धडक कारवाईने अवैध धंदे चालकांत एकच खळबळ उडाली आहे.
अवैध गुटखा व्यवसायावरील ही सर्वात मोठी कारवाई झाल्याने तालुक्यात हा दिवसभर चर्चेचा विषय होता
वाळू तस्करी, गुटखा तस्करी यासारख्या अवैध धंद्यांवर यापुढेही अशीच कारवाई चालूच राहील अशी माहिती पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी माध्यमांना दिली.
गेल्या आठ दिवसांपूर्वी याच गुटखा तस्करावर स्थानिक पोलिसांनी छापा टाकला होता त्यावेळी देखील मोठा गुटखाचा साठा जप्त करण्यात आला होता. मात्र त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही त्यावेळी कारवाई न करता मोठ्या रकमेची आर्थिक तडजोड झाली होती या मोठ्या रकमेच्या तडजोडीनंतर पुन्हा ही कारवाई झाल्याने पोलिसांच्या या भूमिकेवर चांगलीच चर्चा दिवसभर रंगली होती. जिल्ह्यातून आलेल्या पथकाने या केलेल्या कारवाईचे स्वागत होत असले तरी स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण तडजोडीमुळे अकोले तालुक्यात अवैध धंदे सुसाट सुरू असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
Breaking News: Big action in Akole Gutkha worth Rs 1 crore seized