सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, पाच कोटी मागितले!
Salman Khan: सलमान खानला धमकावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
सुपरस्टार सलमान खानला धमकावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना एका व्यक्तीला अटक करण्यात यश आलं आहे. काही दिवसांपूर्वी या व्यक्तीने सलमानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली होती. तसेच ५ कोटी रुपयांची खंडणीही मागितली होती. आता त्या व्यक्तीला जमशेदपूर येथून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणारी व्यक्ती भाजी विकण्याचं काम करतो. लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याची बातमी त्याने नुकतीच टीव्हीवर पाहिली होती. यानंतर खंडणीची मागणी करण्याची कल्पना त्याच्या मनात आली. या व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर धमकीचा मेसेज पाठवला आणि त्यानंतर त्याचा मोबाईल बंद केला.
शेख असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याचं वय २४ वर्षे आहे. शेखने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो भाजी विकण्याचं काम करतो. मात्र सध्या तो काहीच करत नाही. मेसेज पाठवल्यानंतर शेखने माफी मागणारा मेसेज पाठवला होता. मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला. पण नंबर बंद होता. हा मेसेज कोठून पाठवला गेला याचा शोध घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत होते. जमशेदपूरहून मेसेज आल्याचं त्यांना समजलं. जमशेदपूरमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास करण्यात आला आणि आता मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
या व्यक्तीने आपल्या धमकीच्या मेसेजमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव घेतलं होतं आणि सलमान खानकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मेसेजमध्ये लिहिले होतं, “हे हलक्यात घेऊ नका. सलमान खानला जिवंत राहायचं असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी असलेले वैर संपवायचं असेल तर ५ कोटी रुपये द्यावे लागतील. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षाही वाईट होईल.” मुंबई पोलिसांनी धमकीचा हा मेसेज गांभीर्याने घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. धमकी दिल्यानंतर त्या व्यक्तीने माफी मागितली होती. हा मेसेज चुकून पाठवल्याचं मेसेज पाठवणाऱ्याने म्हटलं होतं आणि त्याबद्दल माफी मागतो असंही सांगितलं होतं.
Web Title: Bhajiwala turned out to be a threat to Salman Khan in the name of Lawrence Bishnoi
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study