बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांना इशारा
Balasaheb Thorat on Radhakrishna Vikhe Patil : स्नेह मेळाव्यातून बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
संगमनेर: संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी धक्कादायक पराभव केला. निकालानंतर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यातून बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेचा निकाल लागला आणि आपल्याला धक्का बसला. आपल्याला मताधिक्य किती राहील याचा विचार आपण करत होतो. हे सगळं होत असताना पराभव झाला. हा धक्का बसला हे मान्य करावं लागेल. 1985 पासून एक वेगळ्या पर्वाची आपण सुरुवात केली. संगमनेर तालुक्याची वेगळी संस्कृती आपण निर्माण केली. चाळीस वर्ष आपण मला संधी दिली. प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य वाढवून मला विधानसभेत पाठवले. यावेळी देखील तुम्ही काम करत होतात, मी राज्यात फिरत होतो. मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास होता. पण नेमकं काय घडलं हे आजही समजत नाही. प्रत्येक जण वेगवेगळे कारण सांगत आहे. सगळ्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं. जे दोष असतील ते निश्चित दूर करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मी अनेक खाती सांभाळली आहेत. अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. मी निळवंडे धरणाचे सुरू केलेलं काम पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो. आहे असे त्यांनी यावेळी संभोधीत केले.
प्रवरा कारखान्याने आपल्या तालुक्यात गट ऑफिस सुरू केलं. आता यांचा पुढचा हल्ला आपल्या सहकारी संस्थांवर देखील राहील. नवीन आमदार झाल्यानं त्यांना ही हिंमत झाली आहे. नवीन झालेला आमदार हे त्यांचे हत्यार आहे. काही मंडळी मला म्हणत होती की तुम्ही तिकडे कशाला गेले. मात्र त्यांनी मंत्री (विखे पाटील) झाल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. अनेकांवर खोट्या केसेस टाकल्या. मग माझ्याकडे पर्याय नव्हता. मी हा अन्याय सहन करू शकत नाही. त्यानंतर तिकडे गेलो आणि गणेश कारखाना ताब्यात घेतला. मी स्वतः यांच्या विरोधात खंबीरपणे उभा राहणार आहे. काही झालं तरी देखील मी उभा राहणार, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांना दिला.
आम्हाला त्रास झाला तर मी लढणारच आहे. कोणत्याही त्रासाला आणि तुमच्या धमक्यांना भीक घालणारे आम्ही नाही. तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे हा पराभव झाला हे लक्षात ठेवा. तुमच्या भरोशावर मी राज्यात फिरलो. पण आता सगळं दुरुस्त करायचे आहे. मी तिकडे चांगलं करायला जातो. आपलं राजकारणाचं फाउंडेशन एकदम पक्क आहे. यावेळी थोडासं हलल्याने ते कमकुवत होणार नाही. तुमची साथ द्या, मी आता प्रत्येक गावात जाणार आहे.
Web Title: Balasaheb Thorat on Radhakrishna Vikhe Patil Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study