काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना सत्ता गेल्याचे दुःख: माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil: विश्वासघाताने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.
नगर: काँग्रेसचे आंदोलन केवळ ‘फार्स’ आहे. पक्षाची आता अस्तित्वाची धडपड सुरू आहे. त्यामुळेच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात बेछूट आणि बेजबाबदार आरोप करत आहेत. सत्ता गेल्याच्या वैफल्यग्रस्ततेतून ते आरोप करत आहेत, थोरात यांना सत्ता गेल्याचे दुःख झालेले दिसते, असा टोला भाजप नेते माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी लगावला. भाजप नेते आ. विखे आज, बुधवारी नगरमध्ये होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली. काँग्रेस पक्ष सत्तेत असताना किती वाढला आणि किती जणांची अर्थप्राप्ती वाढली असा टोलाही विखे यांनी लगावला.
राज्यातील मंत्रिमंडळाची चिंता विरोधकांनी करू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही सक्षम नेते आहेत. महाराष्ट्राच्या सर्व विषयांची त्यांना माहिती आहे. त्यामुळे योग्यवेळी महाराष्ट्राला चांगले मंत्रिमंडळ मिळेल, असेही विखे पाटील म्हणाले.
दोघांच्या मंत्रिमंडळाचे निर्णय किती वैध, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, याकडे लक्ष वेधले असता विखे म्हणाले, दोघांचे निर्णय वैध आहेत. हे जनतेच्या मनातील सरकार आहे. ते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल.
सत्ता गेल्यामुळे आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आंदोलने करू लागली आहे. महाविकास आघाडी सरकार केवळ सत्तेसाठी स्थापन झालेले होते. त्यांचा कोणताही ‘अजेंडा’ नव्हता. निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेना एकत्र लढले होते. परंतु विश्वासघाताने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आता जनतेच्या मनातील सरकार आले आहे.
Web Title: Balasaheb Thorat of Congress is saddened by the loss of power Radhakrishna Vikhe Patil