Home अकोले अकोलेत शिवसेना शिंदे गटाचे बाजीराव दराडेंचा राजीनामा, केला हा आरोप

अकोलेत शिवसेना शिंदे गटाचे बाजीराव दराडेंचा राजीनामा, केला हा आरोप

Breaking News | Akole Shiv sena: नियुक्त्या चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप

Bajirao Darade of Shiv Sena Shinde group resigns in Akole

अहिल्यानगर: संघटनेची वाटचाल आणि नियुक्त्या चुकीच्या पध्दतीने होत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला आहे. या राजीनाम्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले की, मी संपर्क प्रमुख शिर्डी लोकसभा पदाचा राजीनामा देत आहे. या पुढे मी शिवसेना शिंदे गट पदाचा कुठेही वापर न करता राजकीय, सामाजिक काम स्वाभिमानी विचार व तत्वाशी तडजोड न करता करत राहील. आज अहिल्यानगर जिल्हयात जी संघटनेची वाटचाल व पद नियुक्त्या सुरू आहे त्या चुकीच्या होत असल्यामुळे आम्ही आमच्या पदाच्या जबाबदारी मधून कार्यमुक्त होत आहे व माझा पदाचा राजीनामा सादर करत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे त्यांचा राजीनामा स्विकारतात की नाकारतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोले दौऱ्यावर होते. शिंदेंच्या या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी नगर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेना संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आपला राजीनामा एकनाथ शिंदेंकडे पाठवला आहे. आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी मेंगाळ आणि दराडे यांच्या अंतर्गत वाद पाहायला मिळाला. त्यामुळे दराडेंनी थेट पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

बाजीराव दराडे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असून जिल्हा नियोजन समितीवर देखील सदस्य होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर तत्कालीन शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या समवेत त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. बाजीराव दराडे यांचा अकोले तालुक्यात दांडगा जनसंपर्क असून दराडे यांच्या राजीनाम्यामुळे एक मोठा गट शिवसेनेतून बाहेर पडण्याची चिन्हे दिसत आहे.

Breaking News: Bajirao Darade of Shiv Sena Shinde group resigns in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here