लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, अंगणवाडी सेविकांना तुमच्या घरात ‘ती’ दिसली तर थेट लाभ रद्द
Ladaki Bahin Yojana: घरात दोघांपैकी कोणाकडेही चारचाकी नावावर असल्याचे निष्पन्न होताच त्या बहिणींचा योजनेचा लाभ रद्द होणार.
पुणे: राज्यात आजमितीपर्यंत सुमारे अडीच कोटींहून अधिक लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत. त्यामध्ये निकषांमध्ये न बसलेल्या महिलांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या महिलांची संख्या कमी करण्याचा महिला व बाल कल्याण विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येचा फुगवटा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे; तसेच या योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत १५०० ऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, त्याची अंमलबजावणी करताना सरकारच्या तिजोरीवर बोजा येऊ नये यासाठी ही खबरदारी घेतल्याची चर्चा महिला व बालकल्याण विभागात आहे.
लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींना एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात पती किंवा सासऱ्यांच्या नावावर चारचाकी असणे आता महागात पडणार आहे. घरात दोघांपैकी कोणाकडेही चारचाकी नावावर असल्याचे निष्पन्न होताच त्या बहिणींचा योजनेचा लाभ रद्द होणार आहे. येत्या दोन दिवसांत अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन बहिणींकडील चारचाकी वाहनांची शहानिशा केली जाऊन लाभ ठेवायचा की रद्द करायचा हे सर्व्हेनंतर निश्चित केले जाणार आहे.
लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी वाहन असू नये, अशी योजनेची अट आहे. अनेक बहिणींनी अटीकडे दुर्लक्ष करून अर्ज भरून आतापर्यंतचे लाभ मिळविले आहेत. आता सरकारने योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा; तसेच पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळू नये, त्यांची नावे वगळली जावीत यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. या विभागाने परिवहन विभागाकडून राज्यातील चारचाकी वाहनमालकांची यादीच मिळवली आहे. ही यादी विभागाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पाठविली जाणार आहे. त्या यादीच्या आधारेच आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या घरी चारचाकी कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करून यादीतील नाव आणि प्रत्यक्षातील व्यक्तींची खातरजमा करणार आहे. त्यामुळे एकत्रित कुटुंबातील पती, सासरे यांच्यापैकी कोणाकडेही चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न होताच लाभाच्या यादीतून त्या कुटुंबातील पत्नी अथवा सून किंवा सासू यांची नावे थेट वगळली जाणार आहेत.
यामध्ये सासऱ्याकडे गाडी असल्यास सासूने लाभ घेतल्यास सासूचा, तर सासूऐवजी सूनेने लाभ घेतल्यास तिचा लाभ रद्द होईल; परंतु एका कुटुंबातील पती-पत्नी हे एका जिल्ह्यात राहत असतील आणि त्यांच्याकडे वाहन नाही; पण सासू-सासरे दुसऱ्या जिल्ह्यात राहत असून, त्यांच्याकडे वाहन असल्यास त्यांचा लाभ ‘सुरक्षित’ राहण्याची शक्यता आहे. सर्व्हेनंतर रद्द करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी सरकारला पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे.
Web Title: Attention dear sisters, direct benefit cancellation if Anganwadi sevaks
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News