दिशाभूल करणार्यांना जनताच धडा शिकवेल: राधाकृष्ण विखे पाटील
Maharashtra Assembly Elections 2024: विकास कामावर चर्चा होण्याची गरज आहे परंतु आज मात्र वैयक्तिक टीका करून विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत.
राहाता: ज्यांच्यामुळे जायकवाडीला पाणी गेले तेच आज निळवंडे धरणाच्या पाण्यातून शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्याची भाषा करत आहेत. निळवंडे धरणातून पाणी आल्याने लाभक्षेत्रात नवचैतन्य आणि समृद्धी आली. लाभक्षेत्रात पोटचार्यांसाठी केंद्र सरकारने 800 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने आता चार्यांची कामेही पूर्ण होतील. पाण्यावर राजकारण करून दिशाभूल करणार्यांना जनताच धडा शिकवेल, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डी विधानसभा मतदार संघातील गोगलगाव आणि सादतपूर येथील मतदारांशी ना. विखे पाटील यांनी संवाद साधला. यावेळी या भागातील मतदार आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. विखे पाटील म्हणाले, निवडणुकीच्या माध्यमातून विकास कामावर चर्चा होण्याची गरज आहे परंतु आज मात्र वैयक्तिक टीका करून विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत. निळवंड्याच्या पाण्यातून या भागाला समृद्धी आली. डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. निळवंडेचे पाणी देत असताना योग्यप्रकारे नियोजन केल्यामुळे प्रत्येक गावाला न्याय देता आला. निळवंडेचे पाणी सोडल्यानंतरही आपण काय केले हे जनता जाणून आहे. परंतु आपली ही बनवाबनवी आता जनतेच्या लक्षात आली आहे. विकासाच्या गप्पा मारणार्यांनी महसूल मंत्री असताना नेमकं काय काम केले हे एकदा जनतेला सांगावे. शिर्डी मतदार संघात दहशत आहे, असे आपण म्हणताय पण आपल्याच भागातील अनेक उद्योजक शिर्डीमध्ये येऊन अनेक व्यवसाय करत आहेत. खरी दहशत ही आपल्याकडे आहे. म्हणूनच आपल्या भागातील उद्योग येथे सुरू आहेत.
विकासाच्या माध्यमातून महायुती सरकारने शेतकरी, युवक, महिला हिताच्या योजना आणल्या आहेत. या योजनेमुळेच आज जनता महायुती सरकार सोबत आहे. कोव्हिड संकटाच्या काळात जनतेला आधार देण्याचे काम प्रवरा परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले. आपण विकास कामांमध्ये कधीही राजकारण केले नाही. येणार्या काळात अनेक विकास कामे महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, कर्जमाफी योजना त्याचबरोबर शेतकरी हिताचे निर्णय महायुतीच्या माध्यमातून घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात आपले सरकार असल्याने राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि आजपर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून महायुतीला मतदान करा, असे आवाहन ना. विखे पाटील यांनी केले.
Web Title: Assembly Elections public will teach the misguided people a lesson Radhakrishna Vikhe Patil
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study