तुमच्या निष्क्रीयतेचे पितळ तुमच्याच मतदारसंघात आता उघडे पडले: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Maharashtra Assembly Elections 2024: Balasaheb Thorat vs Radhakrishna Vikhe Patil: अनेक वर्ष संगमनेरचे नेते मंत्रीपद भोगत होते पण त्यांना असे काही करता आले नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची थोरतांवर टीका.
संगमनेर: अनेक वर्षांपासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना सतावत आहे. त्यामुळेच शिर्डी मतदारसंघात येवून दहशतीच्या मुद्यातून मतदारांची दिशाभूल करीत आहे. परंतु आमचा मतदार हा खूप सूज्ञ आहे. तुमच्या या खोट्या आरोपांना तो बळी पडणार नाही. तुमच्या निष्क्रीयतेचे पितळ तुमच्याच मतदारसंघात आता उघडे पडले असल्याची जोरदार टीका महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
महायुतीच्या प्रचारार्थ संगमनेर तालुक्यातील हजारवाडी, पानोडी आणि पिंपरी लौकी आजमपूर या गावांमध्ये आयोजित केलेल्या बैठकांमध्ये तसेच पदयात्रेतून मंत्री विखे पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. या तीनही गावांत मतदारांनी मंत्री विखे पाटील यांचे जोरदार स्वागत केले. लाडक्या बहिणीही स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले, आज निळवंडेचे पाणी आल्याने हा भाग समृद्ध झाला याचा आपल्यासाठी मोठा आनंद आहे. विविध योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जनतेला आधार देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. आमच्याकडे अनेक योजना आहेत. तुमच्या मंत्रीकाळात केवळ वाळू उपसा योजना होती आणि त्या माध्यमातून तुम्ही काय केले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शिर्डी विधानसभा मतदारसंघात ही गावे समाविष्ट झाल्यानंतर सर्वांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. ही गावे शिर्डीत जोडल्यानंतरही या गावांमध्ये गैरसमज निर्माण करुन दिले होते. परंतु आता लोकांना कळाले त्रास नेमका कुणाचा आहे. आम्ही विकासाला मानणारी माणसं आहोत.
या भागातील जनतेमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण केले. जे तुम्ही तुमच्या तालुक्यातही निर्माण करु शकला नाहीत. आमचे सरकार हे देणारे आहे, त्यांचे सरकार हे घेणारे होते. त्यामुळे चिंता करू नका आम्ही देत राहणार आहोत. कोणतीही योजना बंद पडणार नाही याची ग्वाही देत मंत्री विखे पाटील म्हणाले, काँग्रेसने विकासाची पंचसुत्री ही शुध्द फसवणूक आहे. महायुतीची योजना बंद करायला जे निघाले होते ते आता त्याच योजनेचे नाव बदलून पैसे द्यायला निघाले आहेत. यावर कोणीतरी विश्वास ठेवील का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या भागातून जाणार्या निळवंडे कालव्याचा प्रश्न त्यांच्या काळातच प्रलंबित राहिला.
जमिनींचे अधिग्रहण झाल्यानंतरही शेतकर्यांना त्याचा मोबदला मिळू शकला नाही. आपण त्याचा पाठपुरावा केला. जमिनींचा मोबदला मिळाला आणि पाणीही मिळाले. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या पुढाकाराने दोन्हीही कालव्यांची कामे मार्गी लागली. मग इतके वर्षे कालव्यांची कामे का होवू शकली नाही. या प्रश्नाचे केवळ राजकारण आपल्याला करायचे होते जनता हे समजण्याइतकी दूधखुळी नाही. निळवंडे कालव्यांचे पाणी आणण्याचे श्रेय हे फक्त महायुती सरकारचेच असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले. जिल्ह्याचे अहिल्यानगर नामकरण आणि श्री क्षेत्र नेवासा येथे ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी हे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार असल्याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले, अनेक वर्ष संगमनेरचे नेते मंत्रीपद भोगत होते पण त्यांना असे काही करता आले नाही.
रोजगार निर्मितीही ते उभी करु शकले नाहीत. महसूल मंत्रीपद मिळाल्यानंतर जिल्ह्यातील तीन तालुक्यांना औद्योगिक वसाहतींना आपण जागा उपलब्ध करुन दिल्या. तुमच्या तालुक्यात असे का घडले नाही असा सवाल उपस्थित करुन, आमदार थोरातांना त्यांची निष्क्रीयताच आता सतावत आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळे ते पूर्णपणे हादरले आहेत. तालुक्यातील युवक आता त्यांच्या बरोबर जायला तयार नाहीत. ज्येष्ठ नागरिक आणि महिला देखील चाळीस वर्षांच्या वाटचालीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करु लागल्याने आमदार थोरात हतबल झाले असल्याची टीका त्यांनी केली.
Web Title: Assembly Elections brass of your inaction is now exposed in your own constituency
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study