23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक; उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात
Breaking News | Bribe Case: तक्रारदाराकडे तब्बल 41 लाख रुपयांच्या लाचेची मागणी.
छ. संभाजीनगर : आता छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांस अटक करण्यात आली आहे. तब्बल 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने आरडीसी महोदयांना रंगेहात अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारदाराकडे तब्बल 41 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या घटनेनं जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आरडीसी म्हणजेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली आहे. अव्वल कारकुनामार्फत ही लाच घेण्यात येत असताना अटक करण्यात आली असून विनोद खिरोळकर असं आरडीसींचं नाव आहे. वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठीपूर्वी या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल 41 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार, संबधित तक्रारदाराकडून 23 लाख रुपये घेतले होते. मात्र, तरीही 18 लाख पुन्हा मागण्यात आले होते. त्यातील 5 लाख रुपयांची लाच घेताना आरोपीला अटक करण्यात आली आहे. अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत ही लाच घेतली जात होती.
पोलिसांना झाडाझडतीत काय मिळालं?
विनोद गोंडुराव खिरोळकर, पद निवासी उप जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजी नगर, याची घरझडती घेतली असता खालील प्रमाणे मौल्यवान मालमत्ता मिळून आली आहे.
1) रोख रक्कम-13,06,380/-
2) सोन्याचे दागिने – 589 ग्रॅम किंमत अंदाजे, 50,99,583/-
3) चांदीचे दागिने- 3 किलो 553 ग्रॅम किंमत 3,39,345/-
मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण किंमत- 67,45,308/- रुपये मिळून आले आहेत.
Breaking News: Arrested red-handed while taking Bribe Rs 5 lakh Deputy Collector in the net of ACB