संगमनेर लेडी सिंघमची कारवाई, दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या
Sangamner Robbery: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना संगमनेर-पुणे रस्त्यावर पकडले आहे.
संगमनेर : मागील काही दिवसांपासून संगमनेर शहर व परिसरात चोरी व दरोड्याच्या घटना समोर आल्या आहेत.
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना पोलिसांनी संगमनेर-पुणे रस्त्यावर पकडले. एक जण पळून गेला. संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक फराहनाज पटेल यांनी व संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पोलिस पथकाने शुक्रवारी (दि. १०) पहाटे ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहर पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी महिला पोलिस उपनिरीक्षक पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली चालक हेड कॉस्टेबल अजय आठरे, संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पोलिस पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव यांना पाठविले. हे सर्वजण तपासासाठी जात असताना त्यांना संगमनेर-पुणे रस्त्यावर संगमनेर खुर्द शिवारात विनाक्रमांकाचे चारचाकी वाहन उभे दिसले, वाहनात बसलेल्या पाच जणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. ते पळून जात असताना त्यातील चौघांना पकडण्यात आले. मात्र एक जण पळून गेला.
महेंद्र लक्ष्मण मधे (वय २५, रा. अभंग वस्ती, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), अविनाश चंद्रकांत जाधव (वय २६). प्रवीण चंद्रकांत जाधव (वय २४) (दोघेही रा. शिरोली, बोरी, डावखर मळा, ता. जुन्नर, जि. पुणे), रोहन रामदास गिन्हे (वय २०, हल्ली रा. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे, मुळ रा. अकोले, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) हा पळून गेला आहे.
या चोरट्यांकडून एकूण दोन लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
Web Title: Arrested four, who were preparing to commit a robbery, widened
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App