Home नाशिक ईव्हीएम हॅक करुन उमेदवाराला विजय मिळवून देणारा अटकेत  

ईव्हीएम हॅक करुन उमेदवाराला विजय मिळवून देणारा अटकेत  

Maharashtra Assembly Elections 2024: इव्हीएम हॅक करून तुमच्या उमेदवारास विजय मिळवून देतो, असे आमिष दाखवून एकाने ४२ लाख रुपयांची मागणी केल्याचा अजब प्रकार.

Arrested for hacking EVM and making candidate win Assembly Elections

नाशिक: इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच इव्हीएम हॅक (Hack) करून तुमच्या उमेदवारास विजय मिळवून देतो, असे आमिष दाखवून एकाने ४२ लाख रुपयांची मागणी केल्याचा अजब प्रकार मुंबईनाका परिसरात घडला. तर, हे पैसे न दिल्यास उमेदवार पाडण्याची धमकीही संशयिताने दिली. त्यामुळे तक्रार मिळताच गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करीत संशयितास मखमलाबाद म्हसरुळ लिंकरोडवरून पकडले.

मुंबईनाका येथे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते यांचे पक्ष कार्यालय आहे. आनंद पांडुरंग शिरसाठ यांच्या फिर्यादीनुसार, ते पक्ष कार्यालयात असताना मंगळवारी (दि.५) दुपारी १२.१५ वाजता संशयित भगवानसिंग चव्हाण (रा. अजमेर, राज्य राजस्थान) हा तेथे आला. त्याने शिरसाठ यांना सांगितले की, ‘मी तुम्हाला इव्हीएम हॅक करून १० मतांपैकी ३ ते ४ मते तुम्हाला मिळवून देत निवडणुकीत विजयी करून देतो’ असे आमिष दाखवून त्यासाठी ४२ लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यापैकी ५ लाख रुपये लगेच द्यावे. मात्र, शिरसाठ यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चव्हाण याने सांगितले की, निवडणुकीचे प्रोगॅमिंग करणारे माझ्या ओळखीचे आहेत.

त्यांच्या मदतीने इव्हीएम हॅक करून तुमचा उमेदवार वसंत गिते यांना निवडणुकीत पराभूत करेन अशी धमकी दिली. त्यामुळे शिरसाठ यांनी मुंबईनाका पोलिसांकडे फिर्याद देत संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनांनुसार वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे आदींच्या पथकाने तपास करीत संशयितास मखमलाबाद रोडवरील विठू माऊली कॉलनी परिसरातून पकडले.

संशयित भगवानसिंग नारायण चव्हाण (३४, रा. गोगरा अजमेर, राज्य राजस्थान, सध्या रा. विठू माऊली कॉलनी, म्हसरुळ लिंकरोड) याने सांगितल्यानुसार ते १५ ते २० दिवसांपूर्वीच शहरात रोजगाराच्या निमित्ताने आला. मार्बलचे काम करतो, मात्र निवडणूक सुरु असल्याने पैसे कमवण्याच्या लालसेने त्याने इव्हीएम हॅकचे आमिष दाखवून पैसे घेण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे.

Web Title: Arrested for hacking EVM and making candidate win Assembly Elections

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here